वॉशिंग्टन – अमेरिकेतील कॅपिटल हील परिसरात शुक्रवारी दुपारी चांगलाच गोंधळ उडाला. याठिकाणी एक कार बॅरिकेड्सला टक्कर मारून दोन पोलिसांच्या अंगावरून गेली. यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यूही झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कारचालकावर फायरिंग केले, त्यात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.
कॅपिटल येथे एका तपास चौकीवर ही घटना घडली. कॅपिटल अर्थात संसद भवनाबाहेर कारने बॅरिकेड्सला ठोस मारल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. पोलिसांच्या अंगावरून कार नेल्यानंतर कारचालक चाकू घेऊन बाहेर निघाला. त्यात पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली. सध्या संसदेचे सत्र सुरू नाही. त्यामुळे या परिसरात गर्दी नव्हती.
तीन महिन्यांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी सशस्त्र हल्ला संसदेवर चढवला होता, हे विशेष. संबंधित कारचालक हातात चाकू घेऊन पोलिसांच्या दिशेने धावू लागला होता. त्याने एका पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने वारही केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर बंदूक चालवली. कारचालकाची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्याचा कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे प्रथमदर्शनी आढळत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय तीन महिन्यांपूर्वीच्या घटनेशीही त्याचा काहीच संबंध नाही असे सिद्ध झाले आहे. घटनेनंतर कॅपिटल परिसर लॉकडाऊन करण्यात आला. कर्मचाऱ्यांची ये–जा थांबविण्यात आली. तीन महिन्यांपूर्वीच्या घटनेनंतर याठिकाणी फेन्सींग लावण्यात आले होते. तेदेखील अलीकडेच काढून टाकण्यात आले होते.
काय घडले तीन महिन्यांपूर्वी…
6 जानेवारी 2021 ला ट्रम्प समर्थकांनी संसदेवर सशस्त्र हल्ला चढविला होता. कारचालकाच्या गोंधळामुळे या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. त्या घटनेत 5 लोकांचा मृत्यूही झाला होता. या घटनेचा तपास करणाऱ्या एफबीआयने हा देशाच्या आत दहशतवाद फोफावत असल्याची भिती व्यक्त केली आहे.