वॉशिंग्टन – अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अंतिम मतमोजणीवरुन सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचे समर्थक काल रात्री कॅपिटॉल इमारतीत घुसल्याने वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अध्यक्षीय निवडणुकीत ज्यो बायडन अध्यक्ष म्हणून निवडले गेल्याचे प्रमाणित करण्यासाठी हाऊस आणि सिनेटची बैठक सुरु असताना निदर्शक या इमारतीत घुसले. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना घरी परत जाण्याचे आवाहन केले परंतु अध्यक्षपदाची निवडणूक चोरण्यात आलेली आहे असा दावाही त्यांनी पुन्हा केला.
तत्पूर्वी डेमोक्रॅट पक्षाच्या दोन उमेदवारांनी रिपब्लिकन विद्यमान उमेदवारांचा पराभव करुन जॉर्जियामधील सिनेटच्या दोन जागा जिंकल्या त्यामुळे सिनेटवरील नियंत्रण त्यांच्या बाजूने झुकले.
अध्यक्षपदाच्या अंतिम मतमोजणी प्रक्रियेच्या दरम्यान झालेल्या हिंसक निदर्शनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला आहे. सत्तांतर शांततामय मार्गाने झाले पाहिजे आणि बेकायदेशीर निदर्शनांद्वारे लोकशाहीची पायमल्ली होऊ शकत नाही असे मोदी यांनी आज केलेल्या ट्विट संदेशांमध्ये म्हटले आहे.