कोलकाता – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर असून त्यांनी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला आहे. तृणमूलचा एक खासदार, एक मंत्री आणि अन्य पक्षांचे १० आमदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच ममतांचे विश्वासू सहकारी शुभेन्दु अधिकारी यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
यांचा भाजप प्रवेश
मिदनापूर येथे झालेल्या रॅलीत काही दिग्गजांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यात तृणमूलचे मंत्री आणि ममतांचे विश्वासू शुभेन्दु अधिकारी, खासदार सुनिल मंडल आणि १० आमदार यांचा समावेश आहे. या १० आमदारांमध्ये ६ तृणमूलचे, २ माकपचे, १ काँग्रेसचा आणि १ सीपीआयचा आहे. यानिमित्ताने भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे.
शाहांचा असा आहे दौरा
शाह यांचे दोन दिवसांचे खूप व्यस्त वेळापत्रक असून ते दोन मंदिरात पूजा, तसेच शेतकरी आणि गायक यांच्या घरी भोजन, रोड शो, सार्वजनिक सभांमध्ये सहभाग असा भरगच्च कार्यक्रम आहे. पक्षातील नेत्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी निवडणुका
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यातच होणार आहेत. त्यामुळेच भाजपने मिशन बंगाल हाती घेतले आहे. यापूर्वीच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बंगालचा दौरा केला. तसेच, विविध भाजप नेते आणि मंत्री यांचेही बंगालमध्ये दौरे होत आहेत. यानिमित्ताने बंगालचा विविध भाग पिंजून काढला जात आहे. तसेच, पक्षाचा विस्तार करुन सत्ताधारी ममतांना खिंडीत गाठले जात आहे.