नवी दिल्ली – विरोधकांकडून वसुलीचा आरोप झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त येताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या वृत्ताबाबत शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नसली तरी अमित शाह यांनी या वृत्ताचं खंडनही केलेलं नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
सर्व काही सार्वजनिकरित्या सांगितल्या जात नाहीत
दोन्ही नेत्यांची अहमदाबाद येथे शनिवारी भेट झाली. त्या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते, असं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत विचारलं असता, सर्व काही सार्वजनिकरित्या सांगितलं जात नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. सचिन वाझे यांना अटक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रत्येक महिन्यात १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप लावल्यानंतर शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीला महत्त्व आलं आहे.
शाह आणि पवार यांची भेट योगायोग नव्हे
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीतून वेळ काढून अमित शाह यांचं अहमदाबादला पोहोचणं याला महत्त्व प्राप्त झालं आहे. अहमदाबादला आपण नातीला भेटण्यासाठी आलो होतो, हा राजकीय दौरा नव्हता असं अमित शाह यांचं म्हणणं आहे. परंतु अमित शाह अहमदाबादला पोहोचल्यानंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी तिथं त्यांची भेट घेणं हा योगायोग म्हणता येणार नाही. कोणत्यातरी कार्यक्रमाला जयपूरला गेलेले शरद पवार अचानक अहमदाबादमध्ये थांबणं हा तर योगायोग असूच शकत नाही. सरखेज-गांधीनगर महामार्गावरील अदानी शांतीग्रामच्या कॉर्पोरेट गेस्ट हाउसमध्ये या नेत्यांची भेट झाली.
उद्धव ठाकरे सरकार सुरक्षित ः पटेल
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करण्यासाठी चर्चा करत असल्याच्या वृत्ताचं खंडन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार बनले आहे, त्यामुळे गरज नसलेल्या चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राजकारणात कोणतीत भेट गुप्त नसते ः राऊत
शरद पवार आणि अमित शाह यांच्यात काही कामांनमित्त भेट झाली असल्यास त्यात काही चुकीचं नाही. राजकारणात कोणतीही भेट गुप्त नसते, अशी प्रतिक्रीया शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांनी आरोप करून महाराष्ट्राची बदनामी केली. त्याचं दुःख झालं आहे. विरोधकांना वातावरणनिर्मितीची संधी देऊ नये, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला. विरोधकांना कोणताच रंग नाही, त्यांनी आरोप करून रंग उधळू नये, अशी टीकाही त्यांनी केली.