मुंबई – बाहुबली चित्रपटाचा भव्यदिव्य आदर्श समोर ठेवत आता वैजयंती फिल्म्स असाच एक चित्रपट तयार करते आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वैजयंती फिल्म्सला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अभिनेत्री दीपिका पदुकोण काम करणार आहे. यात खुद्द बिग बी देखील असणार आहेत. यासंबंधी अधिकृत माहिती त्यांनी ट्विटरद्वारे चाहत्यांना दिली आहे.
वैजयंती फिल्म्सला ५० वर्षं पूर्ण होत असल्याने काही दिवसांपूर्वी एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यात पहिल्यांदाच प्रभास आणि दीपिका पदुकोण एकत्र काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या दोन व्यक्तिरेखांव्यक्तिरिक्त आणखी सिनेमात कोण असणार याचे कुतूहल चाहत्यांमध्ये होते. त्यात आता तिसरे आणि महत्वाचे नाव जोडले गेले आहे. अमिताभ यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली आहे. खास टीजरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन हे तिघे एकत्र आल्यावर चित्रपट भव्य असणार यात शंकाच नाही. तूर्तास या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. अभिनेता प्रभासनेही अमिताभ यांचे स्वागत केले आहे. त्यानेही ट्विटरद्वारे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्याने म्हटले आहे. चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.