नाशिक : अमली पदार्थ तस्करीत गेल्या वर्षभरापासून पोलीसांना गुंगारा देणारा संशयीत पोलीसांच्या जाळयात अडकला असून त्यास दिंडोरीरोडवरील तारवालानगर भागात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. अमर उर्फ गोटू प्रकाश बोरसे (३४ रा.बंगला नं.५३,तलाठी कॉलनी तारवालानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. जेजूरकरमळा ते तपोवन मार्गावरील मनपा फिल्टर प्लॅन्ट परिसरात गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी गांजा या अमली पदार्थाचा साठा पोलीसांच्या हाती लागला होता. भरधाव कार एमएच १२ एफक्यू ४०२० अडवून पोलीसांनी प्रशांत नारळे,युवराज मोहिते आणि धनराज पवार यांना बेड्या ठोकत कारमधून ६४.५०० किलो ग्रॅम वजनाचा सुमारे ५ लाख १६ हजार रूपये किमतीचा गांजा हस्तगत केला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गांजा जयेश भाबड आणि अमर बोरसे याचा असल्याचे पुढे आल्याने पोलीस संशयीताच्या मागावर होते. मात्र वर्षभरापासून तो पोलीसांना गुंगारा देत होता. युनिटचे शिपाई राहूल पालखेडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि.१८) संशयीतास जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले. बोरसे आपल्या घरी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून संशयीतास बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस तपासात त्याने गुह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यास गुरूवार (दि.२४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपायुक्त संग्रामसिह निशाणदार, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर,युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,रगुनाथ शेगर हवालदार संजय मुळक,पोलीस नाईक विशाल काठे,दिलीप मोंढे,मोतीराम चव्हाण,शिपाईल राहूल पालखेडे,विशाल देवरे व नाजीम पठाण आदींच्या पथकाने केली.