आधुनिक भगीरथ
थोर स्थापत्यशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ अभियंता भारतरत्न सर डॉ. विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांची आज (दि. १५ सप्टेंबर) जयंती. हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त विशेष लेख…
– मुकुंद बाविस्कर
ज्येष्ठ पत्रकार, नाशिक
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक राजसंस्थाने होती, यात दक्षिण भारतातील म्हैसूर संस्थानाचा थाटमाट आणि बोलबाला मोठा होता. दसरा सणाला म्हैसूर येथे मोठा राजदरबार भरत असे. यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांची आसनव्यवस्था खुर्च्यांवर करण्यात येत असे, तर भारतीय अधिकाऱ्यांची व्यवस्था जमिनीवर भारतीय बैठक पद्धतीने होत असे, दरबारातील एका हुशार भारतीय अधिकाऱ्यांनी हा भेदभाव दूर केला आणि सर्वांसाठी समान आसन व्यवस्था खुर्च्यांवरच केली. काही इंग्रज अधिकाऱ्यांना हा अपमान वाटला. पुढील वर्षी या सोहळ्याच्या निमंत्रण पाठविल्यावर इंग्रजांनी खुर्च्या उंच असल्याने आम्हाला पायाखाली तक्के द्यावे तरच आम्ही येतो, असे पत्र पाठविले. त्यामुळे राजदरबारात मोठी गडबड उडाली. दुसऱ्याच दिवशी सोहळा असल्याने ऐनवेळी इतके तक्के आणणार कुठून असा प्रश्न निर्माण झाला. परंतु तो हुशार अधिकारी आता संस्थांनचा दिवाण बनला होता. त्यांनी कारागिराला करवत आणण्यास सांगितली. सर्व उंच खुर्च्यांचे खालून पाय कापण्यात आले. आता पाय जमिनीवर टिकू शकत होते. इंग्रज अधिकाऱ्यांना तात्काळ उलट टपाली पत्र गेले, खुर्च्यांचे पाय आता आटोपशीर केले आहेत, आता आपले पाय जमिनीवर लागावेत. आणि उंच आसनांवर बसणाऱ्या त्या इंग्रज अधिकाऱ्यांचे पाय जमीनीला लागले. गोष्ट तशी साधी होती, पण त्यात समयसूचकता होती. आणि भारतीयांना कमी लेखणाऱ्या इंग्रजांना धडा शिकविणारी होती. ही समयसूचकता दाखविणारे थोर पुरुष होते, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.
स्वातंत्र्यपूर्व काळ असो की स्वातंत्र्योत्तर कालखंड यादरम्यान सुमारे सहा ते सात दशके स्थापत्य अभियंता म्हणून त्यांनी अपूर्व कामगिरी बजावली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धरणे, कालवे, मोठमोठे पूल, पाणीपुरवठा योजना साकारल्या म्हणून त्यांना ‘आधुनिक भारताचे आधुनिक भगीरथ’ म्हणून ओळखले जाते, त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दि. १५ सप्टेंबर १८६१ रोजी मैसूर (आत्ताचे कर्नाटक) मधील मदनहळळी येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री हे आयुर्वेदातील वैद्य होते. तर आई वेंकट लक्षम्मा धार्मिक वृत्तीची होती. त्यांच्या पूर्वजांचे गाव आंध्रप्रदेशातील मोक्षगुंडम होते. त्यावेळी पूर्वी नावापुढे गावाचे नाव लावण्याची प्रथा होती, त्यामुळेच विश्वेश्वरय्या यांच्या नावापुढे मोक्षगुंडम लागले.
त्यांच्या ठायी असलेली ज्ञान आणि विज्ञानाची आवड पाहून शाळाप्रमुखांनी त्यांच्या प्रगतीपुस्तकावर नोंद केली की, ‘कुशाग्र बुद्धिमत्ता, विनम्रता आणि शिस्त या विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य असून त्याने एका क्षणाचाही आपल्या विद्यार्थी जीवनात अपव्यय केला नाही. हा मुलगा पुढे मोठे नाव कमविल’, शाळा प्रमुखांचे हे बोल कालांतराने खरे ठरले. पुढील काळात ते सर एम. व्ही. या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले.
वडिलांचे निधन झाल्यावर विश्वेश्वरय्या यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी १८७५ मध्ये बंगळूर येथे सेंट्रल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. आणि ते आपल्या काकांकडे राहू लागले. इ.स. १८८१ मध्ये मद्रास (आताचे चेन्नई) येथून परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे येथे अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी घेतले. त्यात ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला त्यांनी प्रारंभ केला. नंतर त्यांची नाशिक येथे बदली झाली. नाशिक विभागातील खान्देश प्रांताचा कार्यभार त्यांच्याकडेच होता, त्या काळात त्यांनी धुळे परिसरात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याकरिता सायफन पद्धतीचा अवलंब केला, आणि तो यशस्वी झाला. त्यानंतरच्या काळात भारतातील कोल्हापूर, हैदराबाद, भोपाळ, बडोदा, इंदूर, फलटण अशा विविध नगरांच्या अनेक संस्थानिकांनी सर विश्वेश्वरय्या यांना शहराच्या विकासाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वाधिकार दिले होते. या शहरांतील त्या काळातील विकासकामे आजही त्याची साक्ष देत आहेत. एकदा सिंध प्रांतातील सक्कर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वास्तविक सिंधू नदीच्या तीरावर सक्कर येथे एका टेकडीवर एक जलाशय कोरडा पडलेला होता. सिंधू नदीचे गढूळ पाणी पंपाने तलावात पोचविण्यात येत असे, ही योजना नगरपालिका व शासनांना परवडणारी नव्हती. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा शक्य नव्हता. सर विश्वेश्वरय्या यांनी नगरपालिकेला सोयीचे होईल होईल, अशी योजना तयार करुन दिली. नदीपात्रात खोल विहीर खोदून तेथून भुयारी मार्गाने ते पाणी एका कुंडात साठवले जाई, त्यानंतर ते इथून शहराला पाणीपुरवठा करण्यात येई, नंतरच्या काळात अनेक शहरात या योजनेसारखी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली.
इ. स. १९०४ मध्ये पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी गटपद्धती योजना शोधून काढली. त्यामुळे पिकांना काटकसरीने पाणी पुरवठा होऊन देश सुजलाम सुफलाम होण्यास हातभार लागला. या तज्ज्ञ अभियंता तथा थोर स्थापत्यशास्त्रज्ञाच्या अनेक योजना यशस्वी होत असल्याने त्यांची किर्ती जगभर पसरली. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचा नावलौकिक वाढू लागला होता. युरोपात एडन येथे इंग्रज सैन्याचा मोठा लष्करी तळ होता. मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यांना समुद्राचे खारे पाणी पिण्याची वेळ आली होती. या थोर अभियंत्याने जगातील भूगर्भशास्त्र, स्थापत्यशास्त्र, रसायनशास्त्राच्या अनेक प्रसिद्ध ग्रंथांचा अभ्यास करून या समस्येवर मार्ग काढला.
भारतातील सर्वात मोठे धरण कृष्णराज सागर हे त्यांच्या अथक प्रयत्नांची साक्ष ठरले आहे. तसेच त्यानंतर तेथे साकारलेला शिवसमुद्रम धबधबा असो की वृंदावन उद्यान असो, हे त्यांच्या भगीरथ प्रयत्नांचे स्मारक ठरले, म्हणून त्यांना ‘आधुनिक भारताचे भगीरथ’ असे म्हटले जाते. पुराणातील भगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली, तर या आधुनिक भगीरथाने भारतातील अनेक नद्यांवर धरण, तलाव आणि कालवे बांधून शेतमळे फुलवले.
सेवानिवृतीनंतर सर्व प्रकारच्या कामातून मुक्त झाल्यावर त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. तेथील धरणे, कालवे, कारखाने, पूल आदि बघितले. भारतात परत आल्यावर वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांच्यावर केंद्र सरकारने गंगा नदीवर राज्याराज्यांमध्ये अनेक पूल बांधण्याच्या योजनेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली, त्यांनी ही कामगिरी अत्यंत कुशलतेने पार पाडली. इ. स. १९५५ मध्ये राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी देऊन गौरविले. दि. १५ सप्टेंबर १९६१ मध्ये विश्वेश्वरय्या यांची जन्मशताब्दी साजरी झाली. अनेक विद्यापीठांनी डि. लीट. सह विविध पदव्या देऊन त्यांचा बहुमान केला. आयुष्यभर अथकपणे कार्य करणाऱ्या या ऋषीतुल्य महापुरुषाने दि. १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी चिरविश्रांती घेतली.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784. ई मेल – baviskarmukund02@gmail.com)