नाशिक – पाथर्डी गावातील महापालिका शाळा क्रमांक ८६ येथील विद्यार्थिनी पुनम गौतम निकम हिची जागतिक बाल शांतता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी जगातील ४२ देशांमधून निवडलेल्या १४२ मुलांच्या यादीत भारतामधून पूनम आणि इतर दोघींची निवड झाली आहे. त्यामुळे ही बाब नाशिककरांसाठी अभिमानास्पद आहे.
पुनमचे वडिल एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात तर आई एका हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करते. पुनमला आणखी तीन बहिणी आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थितीत हे कुटुंब राहते. अशा परिस्थितीतच चारही मुली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. पुनम अतिशय हुशार असून करकामासह विविध बाबीत ती निपुण आहे. तसेच स्वच्छता तिला खुप आवडते. अवघ्या १३ वर्षे वयाची असलेल्या पुनममध्ये मोठा समजूतदारपणा आहे. मनपा शिक्षण विभाग, सी.वाय. डी. ए. संस्था, जीएसके फार्मा आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांमध्ये आरोग्यदायी शाळा वातावरण हा उपक्रम राबविला जात आहे. याचअंतर्गत पुनमला मासिक पाळी संदर्भात विविध प्रश्न निर्माण झाले. त्याचे शंकानिरसन तिने सीवायडीएच्या प्रकल्प कर्मचारी पूनम दिदी यांच्याकडून करुन घेतले. त्यानंतर तिने मासिक पाळीबाबत अधिक माहिती घेतली. यासंदर्भात तिने तिच्या घरात, शाळेतील मैत्रिणी, परिसरातील कुटुंब यांच्यामध्ये जनजागृती करीत आहे.
इतक्या लहान वयात अत्यंत सोप्या शब्दात ती मासिक पाळीविषयी उत्तम माहिती देते. याची दखल घेत मनपा शिक्षण विभाग, सी.वाय. डी . ए. संस्था आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने पूनम निकमचे नामांकन जागतिक बाल शांतता पुरस्कारासाठी करण्यात आले. या पुरस्कारासाठी जगातील ४२ देशांमधून निवडलेल्या १४२ मुलांच्या यादीत भारतामधून पूनम आणि इतर दोघींची निवड झाली आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पूनमचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनगर, सीवायडीएचे प्रकल्प समन्वयक सोपान दाबेराव, सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेचे प्रकल्प समन्वयक गणेश ताठे, मुख्याध्यापक अर्जुन राजभोज, पद्माकर बागड आदी उपस्थित होते.