नवी दिल्ली – भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रमुख समित्यांचं अध्यक्षपद मिळालं आहे. २०२२ साठीची दहशतवादविरोधी समिती, तालिबान निर्बंध समिती आणि लीबिया निर्बंध समितीचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी आज सांगितले.
दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचं तिरुमूर्ती यांनी नमूद केले. सीमेपलीकडच्या दहशतवादाशी लढण्यात भारत अग्रेसर असून, या दहशतवादाचा सर्वाधिक फटकाही भारताला बसला आहे, असे ते म्हणाले.
भारताची अफगाणिस्तानबद्दल असलेली शांतता, सुरक्षा, विकास आणि प्रगती याविषयीची बांधिलकी लक्षात घेता तालिबान निर्बंध समितीला नेहमीच प्राधान्य राहिले आहे, असेही तिरुमूर्ती म्हणाले. लीबिया आणि तिथल्या शांतता प्रक्रियेवर सगळ्या जगाचं लक्ष असताना त्याविषयीच्या समितीचं अध्यक्षपद महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.