मुंबई – कोरोनाच्या काळात नर्स होऊन रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिला गुरुवारी रात्री पॅरॅलिसिसचा अटॅक आला. तिच्या शरीराच्या उजव्या बाजूवर यामुळे प्रभाव पडला आहे. आता तिची प्रकृती स्थिर असली तरी सध्या ती बोलू शकत नाही.
शिखाला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिखाच्या स्वीय सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा स्वतः एक प्रशिक्षित नर्स आहे. कोविडच्या काळात तिने अनेक रुग्णांना मदत केली. त्यावेळी त्यातून ती वाचली. पण ऑक्टोबरमध्ये तिला कोरोना झाला. आणि त्यानंतर आरोग्याच्या दुसऱ्या काही तक्रारी मागे लागल्या. आता तिला पॅरॅलिसिसचा अटॅक आला आहे. कोरोना काळात शिखाने केलेल्या कामाची दखल नीती आयोगाने घेत तिचे सोशल मीडियावर कौतुक केले होते.