नवी दिल्ली – ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिचा १६ नोव्हेंबरला वाढदिवस असतो. एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री सध्या परदेशात असते. तिच्या अभिनयामुळे तिने लोकांच्या मनात तिची जागा निर्माण केली होती. मीनाक्षी शेषाद्री आणि गायक कुमार सानू एकमेकांना आवडत होते, अशा चर्चाही त्याकाळी रंगत असत.
या दोघांची पहिली भेट महेश भट्ट यांच्या ‘जुर्म’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. कुमार सानू विवाहित असल्याने या दोघांनी जवळपास तीन वर्षे आपले अफेअर जगापासून लपवून ठेवले होते. मात्र, कुमार सानू यांची पत्नी रीता भट्टाचार्य यांना या नातेसंबंधांबद्दल कळले. त्यानंतर त्यांच्यात बरेच वाद झाले होते.
सानू यांच्या सेक्रेटरीने तर याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. एका मुलाखतीत तिने सांगितले कि, सानू यांच्या अनेक गर्ल फ्रेंड्स असून सध्या ते मीनाक्षी शेषाद्री यांना डेट करत आहेत. यानंतर १९९४ मध्ये सानू यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चाही बंद झाल्या. त्यानंतर मीनाक्षी शेषाद्री लग्न करून परदेशात निघून गेली. पण, या दोघांपैकी कोणीही आपल्या अफेअरबद्दल कोणतेही विधान कधीही केले नाही.