मुंबई – ‘आशिकी’ चित्रपटातून रातोरात स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय याला ब्रेन स्ट्रोक झाला असून मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहूल सध्या कारगील येथे ‘एलओसी – लाईव्ह द बॅटल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तेथील कडाक्याच्या थंडीचा त्रास झाल्याने त्याला ब्रेन स्ट्रोक झाला.
राहुलचा भाऊ रोमर सेन यानेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला असून त्याची तब्येत सुधारत असल्याचे म्हटले आहे.
एका चित्रपटाने राहूल रातोरात सुपरहिट झाला असला तरी तो कधीही या स्टारडमच्या मागे लागला नाही. त्याला स्वतःला कधीही या क्षेत्रात यायचे नव्हते, ना ही कधी प्रसिद्धीची आवड होती. आपल्या कमिटमेंट्स पूर्ण करणे एवढाच माझा हेतू असल्याचे त्याने सांगितले.
आशिकी नंतर जे चित्रपट माझ्याकडे आले, त्याने मी फार संतुष्ट नव्हतो. कारण तुमच्याबाबतीत एखादा फॉर्म्युला यशस्वी झाला की, लोक तुम्हाला त्याच पद्धतीचे चित्रपट ऑफर करतात, तसेच काहीसे माझ्याबाबतीत झाले. यामुळे एक अभिनेता म्हणून माझी वाढ खुंटली, असे सांगतानाच म्हणून मी काही काळ या क्षेत्रापासून लांब राहिल्याचे त्याने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. आपल्या केसांमुळे लोकप्रिय झालेल्या राहुलने बिग बॉसचा पहिला सिझन जिंकला होता.