मुंबई – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले आहे. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजीव कपूर हे ५८ वर्षाचे होते. त्यांना घरीच हृद विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना चेंबूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजीव कपूर हे अभिनेता दिग्दर्शक राज कपूर यांचे पुत्र होते. तर अभिनेता रणधीर कपूर व ऋषी कपूर यांचे लहान भाऊ होते.त्यांनी १९८३ साली ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. पण, त्यांना अभिनेता म्हणून खरी अोळख मिळाली ती ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या भूमिकेतून. त्यानंतर त्यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणूनही अनेक चित्रपटात काम केले. त्यांनी आसमान , लवर बॉय , जबरदस्त, हम तो चले परदेस या चित्रपटात अभिनय केला. तर प्रेमग्रंथ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले.