मुंबई : बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची एनसीबीने नुकतीच चौकशी केली आहे. तब्बल सात तास झालेल्या या चौकशीनंतर अर्जुन रामपालने सांगितले की, ड्रग्सशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या घरी जी औषधे मिळाली, त्याची पावती माझ्याकडे असून, त्या पावत्या एनसीबी अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचलेला अर्जुन रामपाल संध्याकाळी ६ वाजता कार्यालयाबाहेर पडला. मी चौकशीस पूर्णपणे सहकार्य करत असून एनसीबी अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे त्याने सांगितले.
एनसीबीने बुधवारी रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएडिस हिची बुधवारी चौकशी केली होती. त्यानंतर गुरुवारी तिचा मित्र पॉल बार्टल याला अटक केली. एनसीबीने अर्जुन रामपाल याच्या घरीही धाड टाकली होती. त्यात काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करण्यात आली होती. याचबरोबर रामपालच्या वाहनचालकाचीही चौकशी केली होती. याप्रकरणी आतापर्यंत निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. नंतर तिला जामीन मिळाला.