नाशिक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये पेपर देतांना अनेक तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांना काही पेपर मध्ये कमी गुण मिळाले तर काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले होते. विद्यापीठाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची दखल घेत अभाविप नाशिकतर्फे पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रात ७ डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले होते. विद्यापीठाने तीन दिवसात सुधारित निकाल लावण्याचे आश्वासन देखील दिले. त्याप्रमाणे आज तांत्रिक अडचणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल विद्यापीठातर्फे लावण्यात आले.
वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाला शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयाच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाला होता. सदर विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेताना निकालामुळे अडचणी येत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी अभाविपकडे तक्रार केली व अभाविप नाशिक तर्फे ४ डिसेंबर रोजी या विषयात विद्यापीठास निवेदन देण्यात आले. परंतु तरीही देखील सुधारित निकाल न लागल्याने पुणे विद्यापीठ उपकेंद्रात अभविपने आंदोलन केले व परीक्षा संचालक महेश काकडे यांच्या सोबत दूरध्वनीवर चर्चा करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यास विद्यापीठाला भाग पाडले. या आंदोलनात प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जिल्हा संयोजक अथर्व कुळकर्णी महानगर सहमंत्री सिद्धेश खैरनार, राकेश साळुंके ओम मालुंजकर, सौरभ धोत्रे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले
इतर विषयामध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो असताना केवळ एकाच विषयामध्ये कमी गुण देण्यात आले होते. यामुळे विद्यार्थी प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जात होते. परंतु अभाविपने अगदी वेळेवर आमच्या प्रश्नावर आंदोलन केल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले.
तन्मयी बोरसे (विद्यार्थीनी)
चुकीचा फटका बसायला नको
अभाविपने केलेल्या आंदोलनामुळे हजारो विद्यार्थ्यांचे पणाला लागलेले भविष्य आता उज्वल झालेले आहे. विद्यापीठाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांच्या भविष्यात कधीही बसायला नको.
दुर्गेश पारखी (विद्यार्थी)
विद्यापीठाच्या चुकीमुळे मी एका विषयात नापास झालो
उच्चशिक्षण घेण्यासाठी मला शैक्षणिक कर्ज घ्यायचे आहे व विद्यापीठाच्या चुकीमुळे मी एका विषयात नापास झालो परंतु अभाविपच्या आंदोलनामुळे मला आता शैक्षणिक कर्ज घेऊन उच्चशिक्षण घेता येणार आहे.
गौरंग सिन्नरकर (विद्यार्थो)