चेन्नई / मुंबई : तामिळनाडूतील चेन्नई येथून ३० जानेवारी रोजी अपहरण झालेल्या २६ वर्षीय नौदल दलातील जवानाला पालघर जिल्ह्याच्या जंगलात जिवंत जाळण्यात आल्याच्या अमानुष घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
या प्रकरणी जिल्हा पोलिसांनी सांगितले की, उपचारार्थ दाखल झालेल्या पीडित सूरजकुमार दुबे याने मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला असून मुंबई पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. झारखंडमधील रांची येथील मुळ रहिवासी दुबे चेन्नईतील कोईबतूर जवळ आयएनएस पायनियर जहाजावर तैनात होते. त्यांचे वडील मिथिलेश दुबे म्हणाले की, आम्हाला न्याय हवा आहे. खंडणीसाठी त्याचे अपहरण केले गेले, जेव्हा ते सुट्टीवरुन परत येत होते तेव्हा ३० जानेवारी रोजी रात्री चेन्नई विमानतळाबाहेर बंदुकीच्या धाकाने तीन जणांनी अपहरण केले आणि त्याच्या सुटकेच्या बदल्यात दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तीन दिवस त्याला चेन्नईमध्ये ओलिस ठेवले होते आणि नंतर पालघर जिल्ह्यातील तलासरी भागात वावेजी येथे आणले गेले आणि घोलवडच्या जंगलात त्यांना जिवंत जाळले आणि काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला मुंबईतील नेव्हल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तेथेच त्यांचा मृत्यू झाला.