जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागामार्फत तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिक पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असल्याने ही पुस्तिका सर्वांपर्यंत पोहचविण्यात यावी. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणाऱ्या अभियानात विद्यार्थ्यांना देखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षे विषयीची माहिती वेळोवेळी देण्यात यावी. त्याचप्रमाणे ट्रक, ट्रेलर अशा मोठ्या स्वरूपाच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन परवाना दिल्यानंतर दर तीन ते चार वर्षांनी या वाहनचालकांचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात यावे, जेणे करून वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची अंमलबजावणी होऊन रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गाड्यांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच सामाजिक जाणीवेचे भान ठेवून अपघातग्रस्त व्यक्तिना वेळेत मदत करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात यावे आणि शासनपातळीवर कार्यरत असणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी अधिक कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
येवला येथे तयार करण्यात आलेला ट्राफीक पार्क प्रादेशिक परिवहन विभागाने स्वत:च्या ताब्यात घेवून त्या ट्राफीक पार्कच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये सर्वच प्रकारच्या वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.
रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात प्रबोधनपर मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला सर्वसामान्य लोकांना मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत भाजीपाल्याच्या वाहनांना ऑनलाईन पासेसची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. याप्रमाणेच रस्ता सुरक्षा अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी केले आहे.
३२ वे रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात येवून प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक यांनी तयार केलेल्या ‘रस्ता सुरक्षा मार्गदर्शिक’ पुस्तिका व रस्ता सुरक्षेबाबतच्या माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, प्रादेशित परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी रस्ता सुरक्षा प्रबोधनपर आपले मनोगत व्यक्त केले.