अमरावती – शैक्षणिक संस्थाचालक त्यांच्या समस्या घेऊन मंत्र्याकडे गेले. मंत्री बाहेरगावी गेल्याचे कळाले. त्यामुळे सर्व पदाधिकारी आश्रमशाळेच्या व्हरांड्यात बसले. त्याचवेळी तेथे मंत्री तेथे उपस्थित झाले. त्यांनीही व्हरांड्यातच जमिनीवर ठाण मांडली आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा सारा नजारा पाहून पदाधिकारी अचंबित झाले आणि ठोस आश्वासन मिळाल्यानंतर घरीही परतले.
मागील तीन वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्याचे २५ टक्के थकीत फी परतावा मिळाला नाही. तसेच, अन्य मागण्यांसाठी मेस्टा (महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टी असोसिएशन) संघटनेचे राजाध्यक्ष संजय तायडे पाटील व चाटे स्कूलचे सोमनाथ वाघमारे यांनी शालेय शिक्षम राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी ते कडू यांच्या गावी कुरळ पुर्णा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) गेले. कडू हे निवासस्थानी नव्हते. शेजारच्या गावात काही कामा निमित्त ते गेले होते. मंत्री येईपर्यंत मेस्टाचे पदाधिकारी अपंग आश्रम शाळेतील व्हरांड्यात बसले. ही माहिती मंत्री कडू यांना मिळताच त्यांनीही आश्रमशाळा गाठली. मेस्टा पदाधिकाऱ्यांप्रमाणेच त्यांनीही जमिनीवरच बसणे पसंत केले आणि उपस्थितांशी चर्चा केली.
यावेळी मेस्टा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आरटीईची थकीत रक्कम त्वरीत मिळावी, भंडारा जिल्ह्यातील महेंद्र मेश्राम या शिक्षकाने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना मदत द्यावी, लॉकडाऊननंतर शाळा सुरु करण्यासाठी सर्व शाळांना विविध सुविधा पुरवाव्यात, प्रत्येक १० शाळांच्या मागे एक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन द्यावा. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मेस्टाचे मेस्टा कोषाध्यक्ष मनिष हांडे, राज्यसंघटक अनिल असलकर, अकोला जिल्हाध्यक्ष साहेबराव भरणे, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रमोद गावंडे, श्रीकृष्ण गोरडे, विकास कांदळकर, संजय लहाने, प्रशांत लोखंडे, प्रशांत लांडे अमरावती व अकोला जिल्ह्यातील मेस्टाचे पदाधिकारी उपस्थित होते.