रेमडिसिव्हीर साठा सुरळीत न केल्या प्रकरणी संतप्त छगन भुजबळ यांच्याकडून अन्न, औषध प्रशासनाची कानउघडणी
…..
नाशिक – रेमडिसिव्हीर औषधांचा साठा कमी असतांना नाशिक शहरात या औषधाची प्रचंड टंचाई असतांना अन्न, औषध प्रशासन विभागाकडून सर्वांना सुरळीत वाटप न करता एका खाजगी हॉस्पिटलला एकाच दिवशी १००० इंजेक्शनचा साठा देण्यात आला. त्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अन्न, औषध प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली.
अन्न, औषध प्रशासन विभागाकडून रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा सुरळीत न करता एका खाजगी हॉस्पिटलला १ हजार इंजेक्शनचा पुरवठा केल्याची बाब आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कानावर आली.त्यानंतर त्यांनी अन्न, औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंन्त भामरे यांना बोलावून झाडाझडती घेत शहरात मोठ्या प्रमाणात आवश्यकता असतांना टंचाई असतांना केवळ एकट्या हॉस्पिटलला एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शनचा पुरवठा केल्याबाबत त्यांची कानउघडणी केली.
संतप्त झालेल्या भुजबळ यांनी वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याशी संपर्क करुन जिल्ह्यातील सदर गंभीर प्रकाराबाबत माहिती देऊन नाशिक जिल्ह्यातील रॅमिडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. भुजबळांच्या रुद्रावतरा नंतर औषध उत्पादक कंपनीच्या प्रशासनाने संपर्क करून उद्या ७००० रेमडिसिव्हीरचा साठा देण्यात येईल आणि हे औषध जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे वितरित करण्याची ग्वाही दिली.