जगातील सर्वात लहान माकड – “मारमोसेट”
मारमोसेट लांबी फक्त ३५ सेंटिमीटर असते आणि त्याचे वजन असते ३० ते १०० ग्रॅम एवढेच! त्याचे वस्तीस्थान म्हणजे दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधातील पावसाळी जंगले. अमेझॉनच्या खोऱ्यात देखील ही माकडे आढळतात. त्यांचा रंग पिवळसर तपकिरी आणि काहीसा करडा असतो. त्यांच्या शेपटीवर वलयांकित पट्टे असतात .या माकडाच्या सर्वांगावर मऊ रेशमी केस असतात. त्याच्या डोके आणि गालावरही केस आढळतात.
ही माकडे जुन्या व नव्या जगातील माकडापेक्षाही अनेक बाबतीत भिन्न असतात. या माकडांमध्ये इतर माकडाप्रमाणे पसरट नखे नसून त्यांच्या हातापायांच्या बोटावर सरपटणार्या प्राण्यांप्रमाणे तीक्ष्ण नखे असतात. मात्र मोठ्या अंगठ्यावर अशी नखें नसतात. ती पसरटच असतात. या माकडांचा दुसरा विशेष म्हणजे मादी दोन भिन्न जुळ्यांना जन्म देते .ही माकडे समूहाने राहतात. पंधरा सदस्यांच्या समूहातील फक्त एकच मादी प्रजोत्पादन करते आणि पिलांना वाढविते. या गटात अनेक प्रौढ झालेली माकडे एकत्र राहतात. ही प्रौढ माकडे तसेच पिता दोघेही पिल्लांची काळजी घेतात. नर पिलांची फार काळजी घेतात.
आपल्या पाठीवर घेऊन त्यांना इकडे तिकडे फिरवतात आणि दूध पाजण्यासाठी पुन्हा आईजवळ आणतात. या बुटक्या माकडांचे खाद्य म्हणजे झाडाच्या पानांचा रस ,खोड व फांद्या या वरील लिंक असून ते कीटक, कोळी, फुले, फळे यांचाही अस्वाद घेतात. त्यांचे दात छिन्निसरखे असतात त्यामुळे ते झाडाच्या खोडावर गोलाकार भोकं पाडतात.बंदिस्त व सुरक्षित जागी ही माकडे अकरा वर्षांपर्यंत जगतात .ही छोटी माकडे निसर्गात अद्याप सुरक्षित आहेत. नामशेष होण्याचा धोका त्यांना ना. मात्र त्यांच्या आधिवासाच्या जागाच मानव नष्ट करीत आहे, हाच त्यांना सर्वात मोठा धोका आहे.