मुंबई – बायकोच्या प्रेमाखातर जगावेगळे काम करणाऱ्या कहाण्या खूप आहेत. बिहारमधील दशरथ मांझीवर तर चित्रपटच आला. बायकोला पाणी आणायला जाण्यासाठी डोंगर चढावा लागतो म्हणून मांझी ने डोंगरच पोखरून काढला. प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी वेगळी असते, पण प्रेम यातील कॉमन दुवा आहे. मध्यप्रदेशातील एका गावात नवऱ्याने बायकोसाठी तब्बल ३१ फूट विहीरच खोदून काढली.
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात भानपूर बाबा गावात भारत सिंह मेर नावाची एक व्यक्ती आहे. त्याची बायको घरापासून अर्धा किलोमीटर लांब हँडपंपवर पाणी भरण्यासाठी रोज जायची. तिचा रोजचा त्रास नवऱ्याला बघवत नव्हता. त्यामुळे ४६ वर्षांच्या भारत सिंहने ३१ फूट खोल विहीर खोदून टाकली. त्याच्या जिद्दीला जिल्हाधिकाऱ्यांनीही सॅल्यूट ठोकला. भारत सिंहची बायको ज्या हँडपंपवर जायची त्याचीही स्थिती फारशी चांगली नव्हती. त्याची चेन वारंवार तुटून जायची त्यामुळे कधी कधी तर पाणी न घेताच तिला परत यावे लागायचे. त्याचा भारत सिंहला खूप त्रास झाला आणि दोन महिन्यांपूर्वी त्याने विहीर खोदून काढायचे ठरवले.
१५ दिवसांत त्याने ३१ फूट आणि साडेचार फूट रुंद विहीर खोदली. एवढेच नव्हे तर एक महिन्यात त्याने विहीर पक्की करून एक एकर जमीनही सिंचनाखाली आणली. पहिल्या दिवशी त्याने साहित्य घेऊन जमीन खोदायला सुरुवात केली त्यावेळी चक्क त्याच्या पत्नीनेच त्याची खिल्ली उडवली. नवऱ्याला विहीर खोदणे शक्य नसल्याचे तिला वाटत होते. पाच दिवसांतच १५ फूट विहीर खोदल्यावर मात्र तिचा विश्वास बसला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने त्याचा सत्कार करून सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा विश्वासही दिला.