अनोखा उपक्रम! म्हशीच्या गोठ्यात कादंबरीचे प्रकाशन
आशा रणखांबे, कल्याण
गेली २५ वर्षे वेगवेगळया भाषेतील अनेक साहित्यप्रकार , काव्यसंग्रह, कथासंग्रह, प्रवासवर्णन, आत्मचरित्र , ऐतिहासिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवणारी अग्रगण्य प्रकाशन संस्था म्हणजेच शारदा प्रकाशन होय. शारदा प्रकाशन ही संस्था नेहमीच नवोदित साहित्यिक यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या लेखणीला प्रकाशात आणण्याचे काम सातत्याने करीत आहे.
शारदा प्रकाशनाने ‘शिरसवाड़ी’ ही कादंबरी प्रकाशित केली. कवी, लेखक गणेश बर्गे यांनी आपल्या लेखणीतून ही कादंबरी साकारली आहे. आपण पुस्तक प्रकाशनाचे अनेक कार्यक्रम पाहिले असतील. पण ‘शिरसवाड़ी’ कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आगळया वेगळया प्रकारे झाले. कादंबरीचे प्रकाशन म्हशीच्या गोठ्यात करण्यात आले. कवी गणेश बर्गे यांच्या आईच्या हस्ते शिरसवाड़ी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्या प्रसंगी लेखक गणेश बर्गे यांच्या पत्नी मनिषा बर्गे, मुलगा स्वयम, भावाची पत्नी, भाचा आदी सहपरिवार उपस्थित होते.
लॉकडाउनध्ये ड्रायव्हरची नोकरी गेल्यानंतर हतबल न होता लेखक गणेश बर्गे यांनी गावाकडचा रस्ता धरला. गावाच्या मातीत कादंबरीची बीजे त्यांच्या मनात रुजली. प्रकाशक संतोष राणे यांनी शारदा प्रकाशनातर्फे कादंबरी प्रकाशित करून लेखकाचे मनोबल वाढविले. शिरसवाड़ी कादंबरीची एक नव्हे, तर तिसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झाली. चक्क तीन हजार कॉपी विकल्या गेल्या. पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. लेखकाच्या मानधनातून लेखकाने दोन म्हशी विकत घेतल्या आणि शेती करायला सुरुवात केली.
दहावी नापास असूनही कवी गणेश बर्गे यांची अनुभवजन्य लेखणी, ग्रामीण बाजातील शब्दभांडार वाचकांना भुरळ पाडते आहे. कवी गणेश यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचे ‘दहावी नापास’ नावाचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. वेगळे विषय हाताळणाऱ्या विविध लेखकांची एक हजार पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस प्रकाशक संतोष राणे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.