नवी दिल्ली – बॉलिवूडच्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. यासाठी साहजिकच इंटरनेटची मदत घेऊन कलाकारांचे फोटो किंवा त्यांच्याशी निगडित माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, सेलिब्रिटींबद्दल माहिती गोळा करणे अडचणीत आणू शकते. अमेरिकेची सायबर सिक्युरिटी कंपनी मकॅफी (McAfee)ने भारतातील बर्याच सेलिब्रिटींना सर्वात धोकादायक सेलिब्रिटीच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे जर तुम्ही या सेलिब्रेटींची माहिती गोळा करत असाल किंवा त्यांच्या विषयी इंटरनेटवर सर्च करत असाल तर तुम्ही देखील अडचणीत येऊ शकता.
अमेरिकेची सायबर सिक्युरिटी कंपनी मकॅफी (McAfee) तर्फे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यात असे सूचित करण्यात आले आहे की, संबंधित सेलीब्रेटीबद्दल इंटरनेट माहिती शोधणे धोकादायक ठरू शकते. याचा सरळ अर्थ असा की, जर तुम्ही या सेलिब्रिटींचे चाहते असाल आणि इंटरनेटवर त्यांची माहिती शोधत असाल तर सावधगिरी बाळगा कारण त्या संबंधित कोणत्याही गोष्टीचा शोध घेणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. व्हायरस आणि दुर्भावनायुक्त साइटशी संबंधित असल्या कारणाने त्यांना धोकादायक म्हणून ओळखले जाते. यात प्रथम क्रमांकावर क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव आहे. त्यापाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री तब्बू दुसर्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू तिसर्या स्थानावर, अनुष्का शर्मा चौथ्या तर सोनाक्षी सिन्हा पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच या यादीत सहाव्या क्रमांकावर गायक अरमान मलिक, सातव्या क्रमांकावर सारा अली खान, आठव्या क्रमांकावर दिव्यांका त्रिपाठी आणि नवव्या स्थानावर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गायक अरिजीत सिंग यांचा समावेश आहे.