मुंबई ः प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून चौकशी सुरू आहे. या चौकशीला तब्बल ४० तास उलटले आहेत. या दोघांच्याही मुंबई आणि पुण्यातील घरांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले आहेत. अनुराग कश्यपनं अंधेरी पश्चिममध्ये खरेदी केलेला १४ कोटींचा फ्लॅट तसंच तापसी पन्नूनं केलेले दोन मोठ्या बजेटचे चित्रपट तपास संस्थेच्या निशाण्यावर होते.
दरम्यान, रिलायन्स एन्टरटेन्मेंट ग्रुपचे विशेष कार्यकारी अधिकारी शिबाशिष सरकार फक्त पैशांचा माग काढण्यासाठी चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. परंतु या सर्व छापेमारीत केंद्रीय तपास संस्था पुन्हा एकदा सेल्फ गोल करते की काय अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मुंबईमध्ये जवळपास तीस ठिकाणी प्राप्तीकर विभागानं छापे टाकल्याची प्राथमिक माहिती आली. त्यामध्ये काही नावांवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हे छापे अनुराग कश्यपची चित्रपट कंपनी फॅटममध्ये भागीदार असलेले विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी आणि मधू मंटेना यांच्या ठिकाणांवर पडले.
तसंच रिलायन्स एंटरटेन्मेंटचे सीईओ शिबाशीस सरकार, एक्सीड कंपनीचे सीईओ अफसर झैदी, क्वान कंपनीचे सीईओ विजय सुब्रमण्यम आदींच्या ठिकाणांवरही प्राप्तीकर विभागानं छापेमारी केली. क्वान टॅलेंट कंपनीमध्ये अभिनेता सलमान खान याचीही भागिदारी असल्याचं समोर आलं आहे.
तापसी पन्नू ज्या दोन मोठ्या बजेटच्या चित्रपटात काम करणार आहे, ते अप्रत्यरूपात मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्या बनवणार आहे. हे दोन्ही चित्रपट वायकॉम १८ या निर्माती कंपनीकडे प्रस्तावित आहेत. त्यापैकी एका चित्रपटात ती अभिनेता शाहरूख खान याच्यासोबत झळकणार आहे, तर दुसरा चित्रपट एका प्रसिद्ध खेळाडूच्या जीवनावर बनवला जाणार आहे. या दोन्ही चित्रपटांना वायकॉम १८ ची मातृ कंपनी जिओ स्टुडिओजनं अद्याप हिरवा झेंडा दाखवलेला नाही.
मुंबई चित्रपटसृष्टीत या छापेमारीसंदर्भात दिवसभर चर्चा सुरू होती. या छापेमारीला अनेक जण राजकीय दृष्टीकोनातून पाहात आहेत. अनेक राजयकीय पक्षांनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. पुण्यात तापसी पन्नूच्या निकटवर्तीयांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
अनुराग कश्यपच्या वर्सोवामधील घरात राहणार्या सर्व स्टाफचे मोबाईल बंद होते. अनुराग कश्यपनं नुकताच अंधेरी पश्चिममध्ये मेगा मॉलजवळ एक आलीशान घर खरेदी केलं. त्या घराची किंमत १४ ते १६ कोटी रुपये सांगितली जात आहे. या घराच्या कागदपत्रांबाबत माहिती मिळाल्यावरच ही छापेमारी करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद या चार शहरातील एकूण २८ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने धाडसत्र चालवले आहे. अनुराग आणि तापसी हे दोन्ही शुटींगसाठी पुण्यातील वेस्टिन हॉटेलमध्ये थांबले असतानाच प्राप्तिकर विभागाने त्यांना गाठले आहे. अनुराग आणि तापसी या दोघांच्या मिडिया प्रॉडक्शन कंपनीला बॉक्स ऑफिसवर फायदा झाला त्यातील ३०० कोटी रुपयांचा हिशोब त्यांनी प्राप्तिकर विभागाला अद्याप दिलेला नाही, तसे प्राप्तिकर विभागाने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीचा ससेमिरा अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत.