नवी दिल्ली – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका फेटाळतांना सीबीआय चौकशी योग्यच असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारतर्फे स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली होती. ती सुध्दा फेटाळण्यात आली.
देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त करमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. देशमुख हे १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे सांगत असल्याचे सिंग यांनी म्हटले होते. तसे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली आणि मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर सिंग हे उच्च न्यायालयात गेले. मात्र, महिला वकिलाने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की, देशमुख प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी आणि त्याचा अहवाल १५ दिवसात द्यावा. या निर्णयानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
राजीनामा दिल्यानंतर ते तातडीने दिल्लीला गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची देशमुख यांनी भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी आज झाली व याचिका फेटाळण्यात आली.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली, तर देशमुख यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या वतीने हरीश साळवे यांनी बाजू मांडली.