राजू देसले, कामगार नेते
….
अनिताताई पगारे आपल्या चळवळीतील आठवणी नेहमी स्मरणात राहतील. १९९१ पासून तुम्हाला लढतांना पाहिले. समता आंदोलनच्या चळवळीतील छत्रपती शिवाजी महाराज रोड, शालिमारच्या रस्त्यावर चळवळीची गाणे म्हणताना बघितले. मुंबईत सामाजिक चळवळीत काम करतांना, सांगिनी महिला मंडळच्या माध्यमातून पुन्हा एकदा नाशिक शहरात जोरदार काम उभे करतांना. नाशिक येथे मार्क्स , गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जेव्हा कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय आयोजित केले तेव्हा आपण सोबत काम केले. इतकेच नाहीतर आसिफा अत्याचार विरोधात जुन्या नाशिक येथे भव्य मोर्चाचे नियोजन आपण केले. गेली दोन वर्ष तू शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी जनआंदोलनच्या राष्ट्रीय समन्वयच्यावतीने मेधाताई पाटकर सोबत नेतृव केले. संविधान जागरसाठी महाड ते मुंबई रॅली मध्ये भाग घेतला,. ३० जानेवारी २०२१ ला शेतकरी आंदोलन पाठिंब्यासाठी उपोषण असतांना पाठीमागे बसून आपण चर्चा केली. पण, आता तू आंदोलनात सोबत नसणार, तरी तू केलेले काम आमचे मनोबल वाढवेल..
अजून तर खूप ठरवायच होत. संविधान प्रचार साठी काम करायचं होतं. ताई तू आपल्याला, शेतकरी आंदोलनात महिला दिसल्या पाहिजेत. नेतृत्वची संधी दिली पाहिजे. यासाठी आग्रह धरला. वर्षभर कोरोना काळात शासन – प्रशासनला धारेवर धरले. मेधाताई पाटकर चारवेळा नाशिकला आल्या, त्यावेळी नाशिक जिल्हाधिकारी सोबत झालेल्या चर्चेत तू सहभागी झाली. परराज्यातील अनेकाना घरी जाण्यासाठी पाठपुरावा करतांना चळवळीतील सर्व संपर्क वापरले. नितीन मते, किरण मोहिते, अरुण काळे, आपण रेशन गरजूंना मिळावे यासाठी प्रशासन सोबत काम केले. अनेकांना रेशन तू मिळून दिले.
कल्याणी, जयंत, शीतल सावली सारखे उभे राहून शिकत होती. परिवर्तनवादी चळवळ एकत्रित पुढे जावी. यासाठी रोखठोक भूमिका घेणारी तू होती. Ibn – लोकमतने तुझ्या कार्याची दखल घेऊन सन्मानित केले. मी हजर होतो. त्या दिवशी केलेले मनोगत आजही आठवणीत आहे.
प्रचंड क्षमता असलेली अशी अनिताताई भांडवली व्यवस्थेमुळे जगण्याच्या लढाईत संघर्ष करीत राहिली. प्रचंड वाचन – रोखठोक भूमिका व्यक्त करणारी, स्त्रीपुरुष समतेसाठी लढणारी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज , छत्रपती शिवाजी महाराज विचार वारसा सांगणारी अनिता ताई पगारे. २१ मार्चला कोरोनाशी संघर्ष करत असताना साथी अरुण ठाकूर यांच्या जीवन प्रवास वरील पुस्तकचे ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रमचे सूत्रसंचलन केले. तो ऐकलेला आवाज शेवटचा ठरला. नाशिक चळवळीतील नेतृत्व आज कोरोनाने आपल्यातून हिरावून नेले आहे. चळवळीची हानी आहेच. मात्र आज कल्याणी, मनोहर, व अहिरे, पगारे कुटुंब वर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. खुप एकत्र काम करायचं राहून गेलं.
अनिता पगारेच्या कार्याला सलाम !!
…..