मेधाताई पाटकर सह जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वय (NAPM) च्या सदस्यानी अनिताताई पगारेला अशी वाहिली कार्यांजली
……
जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या (NAPM) राज्य समन्वयक समिती सदस्य, कष्टकरी-शोषितांचा आवाज, स्त्री मुक्ती चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या आणि आपल्या लेखणीतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांचे कोरोनामुळे काल, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये निधन झाले. अनिताताईंच्या अकाली आणि अकल्पित निधनाने एकूणच परिवर्तनाच्या सामाजिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
गेले वर्षभर कोरोना – लॅाकडाऊनच्या काळात अनिताताई अहोरात्र पायाला भिंगरी लावून कार्यरत होत्या. जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाने कोरोनाकाळात विस्थापित झालेल्या श्रमिकांसाठी ‘शासन-नागरिक समन्वया’द्वारे जी सर्वतोपरी मदतयंत्रणा त्या काळात उभी केली, त्यात शासन-प्रशासनापासून तर नागरिकांपर्यंत संवाद व समन्वय साधत ती कार्यक्षम करण्यात अनिताताईंचा महत्वाचा वाटा होता. मुंबईहून गावाकडे जाण्यासाठी पायपीट करणा-या लाखो कष्टकऱ्यांना हर प्रकारची मदत नाशकात उभी करण्याच्या कामात त्यांचा मोठा सहभाग होता. समता आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून अनिता पगारे अगदी तरुण वयातच
सामाजिक चळवळीत सक्रिय झाल्या. गरीबांच्या शिक्षणाच्या प्रश्नांवर, झोपडपट्ट्यांतील दैनंदिन
समस्यांवर अरुण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये जे काम उभे झाले त्यामध्ये त्या
हिरीरीने सहभागी झाल्या. लोकशाही समाजवादाचा संस्कार त्यांना समता आंदोलनात मिळाला. “या
संघटनेने केवळ सामाजिक चळवळच नाही तर आयुष्याचे आत्मभान आम्हाला शिकवले”, असे त्या
नेहमी म्हणत व ते त्यांच्या जगण्यातून व्यक्तही झाले. अरुण ठाकूर यांच्या त्या मानसकन्याच
होत्या आणि अलिकडेच प्रकाशित झालेल्या ‘अरुण ठाकूर- वसा आणि वारसा’ पुस्तकाच्या
निर्मितीतही त्यांचा मोलाचा सहभाग राहिला.
1992-93 साली, म्हणजे वयाच्या अगदी विशीत अनिताताई नर्मदा बचाओ आंदोलनात
सहभागी झाल्या. मेधाताईंसोबत आदिवासी क्षेत्रात, निमाडमध्ये फिरताना त्यांच्या जाणिवा
विकसित होत गेल्या. वैचारिक स्पष्टतेसोबतच कार्याचा झपाटा आणि शिस्त बाणली गेली.
आदिवासींशी त्यावेळी त्यांचे जे नाते जुळले ते अलीकडच्या, ठाणे जिल्ह्यातील ‘आरोहन’ संस्थेच्या
कार्यातूनही अभिव्यक्त झाले.
लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेली ‘वस्तीवरची पोरं’ ही त्यांची मालिका दीर्घकाळ चर्चेत होती.
त्यामध्ये वस्तीतले जीवन त्यांनी स्वानुभवातून मांडले होते. झोपडपट्टीतील माणसाच्या जगण्याचे
प्रश्न, व्यथा, त्यांच्या जगण्याचे दाहक वास्तव ‘वस्तीवरची पोरं’मध्ये त्यांनी मांडले. कुठलाही प्रश्न
मांडताना त्यातील दाहकता मांडतानाच संवेदनेचा ओलावा असलेली, ऊरबडवी नसूनही अंतर्मुख
करणारी तरीही सहज शैली हे त्यांच्या लिखाणाचे, अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होते; त्याचबरोबर,
दु:ख, वंचना व्यक्त करतानाही अस्वस्थ करणारा नर्मविनोद, हे देखील! या मालिकेचा संग्रह पुढे
प्रसिद्ध झाला आणि वाचकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
अनिताताई प्रखर स्त्रीवादी होत्या. संगिनी महिला जागृती मंडळ या संस्थेच्या त्या
संस्थापक अध्यक्ष होत्या. शालेय विद्यार्थिनींच्या मासिक पाळीसंदर्भात जागृती अभियान त्यांनी
चालवले. पोलीस विभागात समुपदेशक आणि प्रशिक्षक म्हणून बरीच वर्षे काम करत असताना
स्त्रीपुरुष समतेच्या, ‘जेंडर इक्वालिटी’च्या संदर्भात त्यांनी केलेले समुपदेशन ही पोलिस यंत्रणेला
‘मानवी’ बनवण्याची धडपड होती. आपल्या संस्थेमार्फत महिला बचत गटांच्या उत्पादनांना
बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. महिला आरोग्य हक्क परिषद, महिला
हिंसा मुक्ती परिषद अशा प्रक्रियांमध्ये त्या समरसून काम करत होत्या. दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये
झालेल्या हिंसा मुक्ती परिषदेच्या यशस्वी आयोजनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. ‘आपलं
महानगर’ रविवारच्या सारांश पुरवणीतील ‘जेंडर गोष्टी’ हा कॉलम त्यांचा विशेष गाजला.
महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने लेखन करत होत्या. समाज माध्यमांवरही त्या अखेरपर्यंत
विचार मांडत राहिल्या.
जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राज्य समन्वयक या नात्याने त्यांचे योगदान
वैशिष्ट्यपूर्ण राहिले. कोरोना काळात विस्थापित झालेल्या कष्टकऱ्यांचे हाल कमी करण्यासाठी तर
त्या प्रयत्नशील राहिल्याच; त्याचबरोबर समन्वयाच्या युवा साथींच्या वैचारिक स्पष्टतेसाठीही
कार्यरत राहिल्या. या काळात संपर्कांवर आलेल्या मर्यादा ओलांडण्यासाठी ऑनलाईन अभ्याससत्रांचे
कल्पक आणि वैशिष्ट्यपूर्ण आयोजन; त्यामध्ये आजचे प्रश्न, मुद्दे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील,
देश व देशाबाहेरीलही विचारवंत, कार्यकर्त्यांना निमंत्रित करणे आणि अत्यंत सुविहितपणे ती
अभ्याससत्रे चालवणे यासाठीच्या युवा कार्यकर्त्यांच्या टीमवर्कचा अनिताताई या महत्वाचा दुवा
राहिल्या. ‘हम तो बोलेंगे –‘ या, जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय अभियानात
महाराष्ट्राचा सहभाग विशेष जोरकस, समावेशक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आंदोलनांचा,
रचनात्मक कार्याचा, समन्वय प्रक्रियांचा आढावा घेणारा आणि त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या
प्रत्यक्ष सहभागाचा राहिला त्यातही महत्वाचे योगदान अनिताताईंचे राहिले.
गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण धोरणाच्या विरोधातील शिक्षण हक्क सत्याग्रहाच्या प्रक्रियेत शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती-संस्थांना जोडून घेण्याचे काम त्या करत होत्या. दिल्लीत सुरू असलेल्या
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात सुरू असलेल्या कार्यातही त्या सक्रिय होत्या. मिट्टी
सत्याग्रहासाठी महिला कार्यकर्त्यांच्या टीमसह दिल्लीला जाण्याची तयारी त्या करत होत्या.
समन्वयाच्या ‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ या मासिक मुखपत्रात त्या ‘कार्यकर्ता’ हे सदर
मागील जवळजवळ वर्षभर चालवत होत्या, ज्यातून कार्यकर्तेपणाच्या घडणीसह समाजाचेही
ताणेबाणे उलगडत होत्या. एनएपीएमच्या प्रत्येक मीटिंगच्या मिनिट्सपासून तर प्रेसनोटपर्यंतची
प्रचार-प्रसाराची जबाबदारीही त्या अतिशय तत्परतेने आणि कौशल्याने पार पाडत होत्या.
समाजपरिवर्तनाची आस बाळगणारा, संघर्ष आणि रचना यांचा मनोज्ञ मिलाफ अनिताताईंच्या
व्यक्तिमत्वात होता. अगदी आतून, पोटातून व्यथा, वेदना, भयानक वास्तव समोर मांडणाऱ्या, अनेकानेक
स्त्रियांच्या दु:ख आणि वेदनांना वाचा फोडणाऱ्या आणि समाजातील दलित, पीडित स्त्रियांसाठी
हक्काचा, मायेचा आधार असणाऱ्या अनिताताई… दलित-आदिवासी-स्त्रिया व अन्य पीडितांसाठी
सतत संघर्षरत राहणाऱ्या, त्यांच्यावरील अन्यायाला सातत्याने मांडत त्यांना आवाज मिळवून
देणाऱ्या अनिताताई… कुठल्याही अन्यायाविरोधात निर्भयपणे उभ्या ठाकणाऱ्या, तडफदार, झुंजार
अनिताताई… विचारशील आणि कृतीशील अनिताताई, फार अकाली निघून गेल्या, याचा
महाराष्ट्रातल्या सर्वच सामाजिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे .
घंटागाडी कामगारांच्या प्रश्नांवर लढा उभारणारे मनोहर अहिरे हे त्यांचे जीवनसाथी, तर
त्यांची लेक कल्याणी ही देखील अनिताताईंच्या बरोबरीने त्यांच्या कामात उतरलेली आणि आता
धडाडीची कार्यकर्ती म्हणून ओळखली जाणारी. त्यांच्यासह अनिताताईंचे आईवडील, अन्य कुटुंबीय,
विस्तारित मित्रपरिवार, सहकारी या सर्वांना अनिताताईंच्या निधनाचा आघात सोसण्याचे बळ
मिळो.
अनिताताईंचे कार्य पुढे नेणे, त्यांच्यासारखे प्रगल्भ, संवेदनशील, कृतिशील कार्यकर्ते घडणे
हीच त्यांना कार्यांजली ठरेल. ‘साथी तेरे सपनों को – मंजिल तक पहुंचायेंगे’ हा शब्द
अनिताताईंना देऊ या !
मेधा पाटकर, संजय मं.गो., सुनीती सु.र., सुहास कोल्हेकर, विलास भोंगाडे, सुगन बरंठ, विनय
र.र., युवराज गटकळ, जमीला बेगम, चेतन साळवे, योगिनी खानोलकर, सुजय मोरे व साथी.