-
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आत्मचरित्राचे प्रकाशन लेखकांच्या पत्नी चंद्रकला सातपुते यांच्या हस्ते संपन्न, प्रसिध्द कवी प्रकाश होळकर यांची प्रमुख उपस्थीती
-
इंडिया दर्पण मीडिया हाउस प्रकाशनाचे पहिले पुस्तक वाचकांच्या भेटीला
-
पुस्तक प्रकाशन सोहळ्यातून दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश
-
महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक अशोक पानवलकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचे वाचन
-
९४ व्या मराठी साहित्य संमेलन व विद्रोही साहित्य संमेलनाचे पदाधिकारी पहिल्यांदाच आले एकत्र
नाशिक – साहित्य क्षेत्रातील प्रकाशन सोहळ्याच्या परंपरेला फाटा देत शंकर उमाजी सातपुते यांचे अनवट वाट स्टेशनमास्तरची या आत्मचरित्राचे प्रकाशन त्यांच्या पत्नी चंद्रकला सातपुते यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिमाखदार पध्दतीने संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी प्रकाश होळकर यांची होती. विशेष म्हणजे या पुस्तक सोहळ्यात ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर व विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, कामगार नेते राजू देसले हे पदाधिकारी पहिल्यांदाच एकत्र आले.
महिला सशक्तीकरणाचा संदेश देत हा सोहळा ७ मार्च रोजी त्र्यंबकेश्वर रोडवरील ग्रेप काउंटी येथे कौटुंबिक पध्दतीने साजरा झाला. इंडिया दर्पण मीडिया हाऊसने प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करुन या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
कोरोनाचे सावट सर्वत्र असतांना या छोट्याशा कौटुंबिक कार्यक्रमातून मोठा संदेश देण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून करण्यात आला. या पुस्तकाला महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक अशोक पानवलकर यांनी लिहलेल्या प्रस्तावनेचे वाचन संध्या सातपुते – माने यांनी केले तर सुषमा सातपुते – शिंदे यांनी सर्व भावंडाच्या वतीने हृदस्पर्शी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात पुस्तक निर्मितीत सहाय करणा-या मनीष बा-हे, हेमंत वाले, विष्णू थोरे, महेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पाहुण्याचे स्वागत इंडिया दर्पणचे साहित्य व संस्कृती विभागाचे संपादक कवी देवीदास चौधरी यांनी केले. तर इंडिया दर्पणची माहिती कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर यांनी दिली. संपादक गौतम संचेती यांनी सुत्रसंचालन केले. या सोहळ्याचे संयोजन शाम सातपुते, डॅा. प्रमोद सातपुते, जगदिश देवरे, पराग पाटोदकर, इंडिया दर्पणचे जनरल मॅनेजर संजय राकेजा, जाहिरात प्रतिनिधी राहुल भदाणे यांनी केले.या कार्यक्रमात स्वामिनी मालिका व सूर नवा ध्यास नवा फेम सृष्टी पगारे, राशी पगारे यांनी गीत गायन केले. रिना संचेती यांनी गणेशवंदना सादर केली.
असे आहे पुस्तक
आयुष्य कसे आनंदाने जगायचे याचा परिपाठ सांगणारे शंकर सातपुते यांचे अनवट वाट स्टेशनमास्तरची हे पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने आपल्या जीवनाचा आलेख अतिशय साध्या सोप्या शब्दात मांडला. त्यात कोणताही बडेजाव नाही. त्यांनी सरळ शब्दात जे घडले ते कागदावर उतरवले आहे. सातपुते यांचे शिक्षणानंतरचे आयुष्य हे रेल्वेच्या नोकरीत गेले. येथे त्यांच्यावर इंग्रजी शब्दाचा प्रभाव जास्त होता. पण, तरी सुध्दा त्यांनी मराठीत लिहिलेले हे पुस्तक अप्रतिम आहे.
संघर्षमय प्रवास
या पुस्तकात वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव ते थेट मुंबईपर्यंत केलेला संघर्षमय प्रवाससुध्दा रोचक आहे. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर त्यांना रेल्वेत लागलेली नोकरी, लग्न व त्यानंतर मुलांचे शिक्षण यांचा प्रवाससुध्दा रोमांचकारी आहे. थेट मनमाडसारख्या महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाच्या जंक्शन रेल्वेस्थानकावर स्टेशन मास्तर म्हणून मिळालेली जबाबदारी व त्यावेळेस आलेले अनुभवही त्यांनी या पुस्तकात कथन केले आहे. ते सुध्दा इतरांना मार्गदर्शक ठरावेत असेच आहे.
८३ व्या वर्षी लेखणी धरली हातात
आपले जगणं इतरांनाही कळावे म्हणून सातपुते यांच्या मनात पुस्तकाची कल्पना आली. आपल्या नातवांना, पुढच्या पिढीला व इतरांनाही या पुस्तकातून प्रेरणा मिळावी हा या मागचा हेतू आहे. म्हणूनच सातपुते यांनी थेट वयाच्या ८३ व्या वर्षी लेखणी हातात धरून हे पुस्तक लिहिले. त्यांच्या या पुस्तकातून जगण्याचा आनंद कसा घ्यावा याचे पाढे आहे. त्यामुळे ते वाचतांना निश्चित आनंद मिळतो.
कुटुंबव्यवस्थेला दिले महत्त्व
खरं तर प्रत्येकाच्या आय़ुष्याची वाट ही गुंतागुंतीची असते. चढ-उतार, संघर्ष काहींच्या वाट्याला येतो, तर काही जणांना तो स्पर्शही करत नाही. ज्यांना स्पर्श करत नाही त्यांना जीवनाचा आनंद घेता येतोच असेही नाही. उलट संघर्ष करून कष्टाने पुढे आलेली माणसे वेगळं काही तरी करतात. निवृत्त स्टेशन मास्तर शंकर सातपुते यांची गोष्ट अशीच आहे. त्यांच्या आयुष्यात कष्ट, संघर्ष आला. पण, तो त्यांनी आनंदाने स्वीकारला. भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला एक महत्त्व आहे. आता बदलत्या काळात तर त्याची अधिक गरज आहे. या पुस्तकात कुटुंबाला सोबत घेऊन कसे चालावयाचे याची गाइडलाइन आहे.
शिक्षणाचे महत्त्व – मुलांना केले उच्चशिक्षित
माणसं गोळा करणे, नाते जपणे व त्यातून आनंद घेणे हे सातपुते मास्तरांच्या आयुष्यातील मूळ गाभा आहे. लहानपणी केलेले कष्ट, शिक्षणाला त्यांनी दिलेले महत्त्व अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे किशोरवयात त्यांच्यात आलेला प्रौढपणा, प्रेमळ पती म्हणून पत्नीची घेतलेली काळजी, वडीलभाऊ म्हणून आपल्या भावाबहिणींची समर्थपणे पेललेली जबाबदारी , कुटुंबातल्या उत्कृष्ट समुपदेशकाची त्यांनी उत्तम पार पाडलेली भूमिका नव्या पिढीला मार्ग दाखवणारी आहे. मुलांना उच्चशिक्षित करून त्यांना बाहेरगावी पाठवणे, मुलगा-मुलीमध्ये भेद न करणे अशा कितीतरी घटना त्यांनी त्यांच्या या पुस्तकात सांगितल्या आहे.
सातपुते यांची गोष्ट बोधकथा
हे पुस्तक सर्वांसाठी एक ठेवा ठरावा असेच आहे. सातपुते यांची ही गोष्ट असली तरी ती बोधकथा आहे. लहानपणी आपण अनेक गोष्टी एेकतो, त्याची पात्र आय़ुष्यभर आपल्या मनावर गारुड घालतात. तशीच सातपुते यांची गोष्ट आपल्या स्मरणात तर राहिलच. पण, जीवन जगण्याचा मार्गही दाखवेल. त्यांच्या या पुस्तकात आयुष्य कृतार्थपणाने आणि भरभरुन जगल्याची भावना आहे. म्हणून हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे.
हे पुस्तक ऑनलाईन बुक करण्यासाठी ही आहे लिंक
-
पाने २३६, किंमत २५० , सवलतीच्या दरात – १५० रुपये
-
परफेक्ट बाइडिंग, उत्कृष्ट छपाई