नरेश हाळणोर
नाशिक : १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात याच काळात बाधितांची संख्या चारपटीने वाढली आहे. २३ मार्च ते ३१ मे या लाॅकडाऊन होते. यादरम्यान जिल्ह्यातील ११ हजार ५९१ नागरिकांची चाचणी केली असता, १ हजार २०३ कोरोनाबाधित आढळून आले होते. तर १ जून ते ३० जुलै या अनलॉक काळात जिल्ह्यात चाचण्यांचे लाॅकडाऊनच्या तुलनेने प्रमाण चारपटीने वाढले, त्यामुळे दहापटीने अधिक बाधितही आढळून आले.
जिल्ह्यात तब्बल ४० हजार १६७ नागरिकांची चाचणी केली असून त्यात १२ हजार ५५६ बाधित आढळून आले. चार महिन्यात जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ७५९ इतकी झाली असून त्यातील १० हजार ७१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ४९६ बाधितांचा मृत्यू झाला तर उर्वरीतांवर उपचार सुरु आहेत.
जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओळखून राज्यात २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरु केले. जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित २९ मार्चला आढळून आला. त्यानंतर जिल्ह्यात मालेगावमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याचे पहावयास मिळाले. जिल्ह्यात २९ मार्च ते ३१ मे या दोन महिन्यात जिल्ह्यात ११ हजार ५९१ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यातील १ हजार २०३ बाधित आढळून आले तर ८२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि ७२ बाधितांचा मृत्यू झाला. तसेच अनलॉक असलेल्या १ जून ते ३० जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४० हजार १६७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२ हजार ५५६ बाधित आढळून आले तर ९ हजार ८९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि ४२४ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढलेला दिसून येत आहे. विशेषत: लॉकडाऊन काळात मालेगावमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असताना अनलॉक काळात तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. तर नाशिक शहर व ग्रामीण भागात अनलॉक कालावधीत झपाट्याने बाधितांची वाढ झाली आहे.