अध्यात्म आणि शिक्षण
पूर्वेकडील देशांमध्ये हे मानलं जात होतं की मनुष्याच्या जीवनात तीन पैलु असणे आवश्यक आहे. ते म्हणजे शारीरिक-मानसिक आणि अध्यात्मिक. आपण बौद्धिक आणि शारीरिक स्तरावर खूप प्रगती केली आहे. परंतु अध्यात्म बाबत आपल्याला याचा विसर पडलेला आहे.
- संत राजिंदर सिंहजी महाराज
प्राचीन संस्कृतीमध्ये नैतिक गुणांच्या विकासाला आपल्या शिक्षण व्यवस्थेचे आवश्यक अंग मानले जात असे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकासाबरोबर नैतिक शिक्षणाचे सुद्धा सम्मिलित होते. मागील शतकांमध्ये जगभरातील शैक्षणिक संस्था मध्ये नैतिक शिक्षणाला वगळण्यात आलेले आहे. कारण केवळ शैक्षणिक प्रगतीवर पूर्ण जोर दिला गेला. याचा परिणाम असा झाला की आज आपल्यासमोर अशी एक पिढी आहे, जिच्यात नैतिक मूल्यांचा अभाव आहे. रस्त्यावर होणारे अपराध, मुलांमधील हिंसा, आनंद मिळण्यासाठी नशील्या पदार्थांचे तसेच दारुचे सेवन, तसेच विनाकारण हिंसा होताना आपण पाहतो- युवा पिढी घडवतांना नैतिक शिक्षणाचा अभाव हेच आहे. व्यक्तिगत आणि वैश्विक स्तरावर शांती स्थापन करण्याकरिता आपण बालपणापासूनच योग्य असे नैतिक शिक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे. जर आपण त्यांना चांगले आणि वाईट हे समजावून सांगितले तर ते आदर्श मानव बनतील. जे स्वतःसाठी आणि आपल्या समाजासाठी योग्य निर्णय घेऊ शकतील.
याकरिता आपणाला विद्यार्थ्यांना योग्य असे शिक्षण दिले पाहिजे. जगभरातील शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष दिले जाते. शाळांमध्ये आरोग्य सुरक्षा आणि पोषक आहार यांचे वर्ग असतात. विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवले जातात, जसे की विज्ञान, गणित, समाजशास्त्र, भाषा आणि साहित्य शिकविले जाते. विद्यार्थी कला आणि संगीत सुद्धा शिकतात. बऱ्याचशा शाळांमधून अध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण कुठेही नजरेस पडत नाही. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपली शिक्षण पद्धती अशा प्रकारे तयार केली पाहिजे ज्यात अध्यात्म आणि नैतिक मूल्यांवर शिक्षण दिले जावे हे आवश्यक आहे.
नैतिक शिक्षणाचा अर्थ असा की आपण असे मानव घडवूया, जे प्रेम, दया, सत्य आणि नम्रता या गुणांनी युक्त असतील. मुलांसमोर आपण या सर्व गुणांचा आदर्श ठेवावा. जेणेकरून विद्यार्थी आपल्या जीवनात हे गुण धारण करतील. याकरिता आपण दर्शन अकादमीच्या पंधरा विद्यालयांची स्थापना केली आहे. या विद्यालयांमध्ये दररोज अध्यात्म आणि नैतिक शिक्षणाचा एक तास असतो. या विद्यालयांमध्ये विद्यार्थी अन्य देशातील लोकांविषयी माहिती जाणून घेतात. येथे विविध धर्मांचे तुलनात्मक अध्ययन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेकतेतून एकता हा संदेश प्राप्त होतो. त्यांना शांत बसून ध्यान एकाग्र करण्याचे सांगितले जाते. जेणेकरून ते आपल्या अंतरी शांती प्राप्त करू शकतील.
ज्ञानाचा संबंध कोणत्याही विशेष धर्मा शी नाही. येथे कोणत्याही देशाचे अथवा धर्माचे विद्यार्थी एकत्र बसून धर्माचे अध्ययन व ध्यानाभ्यास करू शकतात शकतात. ध्यानाच्या या शांतीपूर्ण तासाला विद्यार्थ्यां समोर आपल्यातील आत्मिक खजिना शोधण्याचे लक्ष्य असते. ते शरीर व मनाने पूर्णतः जागरूक असतात. ध्यानामुळे त्यांना आपल्या खऱ्या आत्मिक स्वरूपाला जाणण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त अहिंसा, सत्य, नम्रता, पवित्रता, करुणा आणि निष्काम सेवा इत्यादी सदगुणांना ते आपल्या जीवनात धारण करतात.
आपल्या आत्मिक स्वरूपाला जाणल्यानंतर विद्यार्थ्यांना असे दिसून येते की सर्व लोकांमध्ये प्रभूची ज्योती आणि त्याचे प्रेम विद्यमान आहे. हा अनुभव त्यांना सहनशील आणि सर्वांवर प्रेम करणे शिकवितो. समाजात वेगवेगळे रंग-रूप असलेले सुद्धा सर्वजण एकाच ज्योती पासून बनलेले आहेत. हे ज्ञान त्यांना होते. असे ज्ञान प्राप्त झाल्यावर ते सर्वांवर प्रेम करायला शिकतात. जेव्हा आपण दुसऱ्यावर प्रेम करायला तसेच त्यांचा आदर करायला शिकतो, तेव्हा आपण स्वतः शांत आणि अहिंसावादी बनतो. जेव्हा आपण सर्वांना आपल्या कुटुंबाचा एक भाग समजतो, तेव्हा आपल्या अंतरी दुसऱ्याच्या प्रति करुणा भाव जागृत होतो. कारण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण दुखवण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. अशाप्रकारे नैतिक मूल्य शिक्षण घेतलेले संस्कारवान विद्यार्थी आपल्या मानव परिवारातील कोणत्याही सदस्याला दुःखी करणार नाहीत.
आपण आपल्याला जाणणे आणि आपल्या अंतरी विराजमान प्रभू-सत्तेशी जोडणे, तसेच ज्योति व श्रुतीचा (शब्दाचा) अभ्यास केल्याने अनेक लाभ सर्वाना होतात. भले तो विद्यार्थी असो, शिक्षक असो, किंवा अन्य कोणी. ध्यानाच्या वेळी आपण डोळे बंद करून अंतरी निरीक्षण करतो. त्यावेळी आपण ध्यानाला एकाग्र करत असतो. जर आपण एकाग्रतेने मन शांत करायला शिकलो तर आपण या प्रक्रियेने आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग करू शकतो. याचा परिणाम असा होतो की आपण जे काही शिकतो, त्याला चांगल्या प्रकारे समजून घेतो. ध्यानाने बौद्धिक योग्यता वाढण्या बरोबर, आपले आरोग्य चांगले होते कारण आपण तणावातून मुक्त होतो. आपण अनावश्यक आक्रोशापासून वाचतो आणि या जीवनाच्या कठीण कालावधीचा आणि तणावांचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतो.
यासाठी जर लहान वयांपासून विद्यार्थ्याना ध्यान आणि एकाग्रता करण्याची पध्दत शिकविली तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बाबतीत त्यांचा चांगला विकास होईल. ते प्रत्येक माणसांत आणि प्रत्येक प्राण्यांत प्रभूची ज्योति पाहतील. त्यांच्या मनात सर्व मानवते करिता प्रेम आणि करुणेचा भाव असेल. जर जगातील सर्व शिक्षण संस्थानी ध्याना-अभ्यास आणि अध्यात्मिक शिक्षणाला आपल्या पाठ्या-पुस्तकांत स्थान दिले, तर आजपासून पंधरा, वीस किंवा पंचवीस वर्षो नंतर, आपण असे मानव घडवू की जे प्रेम आणि दयाभावाने ओतप्रत असतील. हि एक अशा युगाची सुरुवात असेल, ज्यात लोक आपल्यासाठी जास्ती-जास्त संचय न करता दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करतील. अशा एका सुर्वण युगाची सुरुवात होईल, ज्यातील लोक अधिक संचयावर लक्ष न देता दुसऱ्याच्या उपयोगी पडतील. हे असे सुवर्ण युग असेल, ज्यात सृष्टीतील प्रत्येक जीवाची काळजी घेतील. जर बौद्धिक आणि शारीरिक शिक्षणा बरोबर लहान मुलांना नैतिक शिक्षण दिले, तर हे विश्व शांती आणि आनंदाचे स्थान होईल.