पिंपळनेर, ता. साक्री – साक्री तालुक्यातील तब्बल २६९ गावांची पेसा कायद्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, त्यांना अद्यापही लाभ मिळत नसल्याने आमदार मंजुळा गावीत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या गावांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी राज्यापलांकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार गावीत यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तालुक्यातील पेसा बाबत आणि वन विभागाच्या भरती बाबत निर्णय होणे आवश्यक आहे. तालुक्यातील २६९ पेक्षा अधिक गावे जी अधिसूचना निघाली आहेत ती तात्काळ ऑनलाईन प्रणाली मध्ये टाकण्यात यावीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तालुक्यातील गावे पेसा पासून कसे वंचित आहेत, हे सर्व गावांचे अधिसूचना निघून सुध्दा पेसा संदर्भातील लाभ मिळत नाहीत, तसेच ५ % अबंध निधींपासून देखिल ही गावे वंचित आहेत, अशी तक्रार पत्रात करण्यात आली आहे.
या गावांमधील शिक्षित तरुणांना नोकरभरती मध्ये ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याबाबत गावित यांनी राज्यपालांशी चर्चा केली. वनविभागाने १४ मुलांना नोकरी पासून वंचित ठेवले आहे हे सुद्धा राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. हे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश राज्यपालांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. याप्रसंगी डॉ तुळशीराम गावीत हे उपस्थित होते.