पाटणा – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे सत्तेत असो वा नसो कायमच त्यांच्या विविध विधानांद्वारे चर्चेत राहतात. आताही त्यांनी एक विधान केल्याने ते संपूर्ण देशात चर्चिले जात आहेत. बिहारच्या बेगुसरायमध्ये त्यांनी हे विधान केले. कृषी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जे अधिकारी शेतकऱ्यांचे एेकत नसतील, त्यांच्या तक्रारी समजून घेत नसतील त्यांना बांबूने हाणा. आम्ही त्यांच्याकडून ना कुठले अनैतिक काम करून घेत आहे, ना त्यांचे अनैतिक काम पोटात घालत आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने अनैतिक कामाचा नंगा नाच केला तर ते सहन केले जाणार नाही.’
बेगुसरायच्या खोदावंदपूर कृषी विज्ञान केंद्रात जलवायू अनुकूल शेतीसह कृषी प्रशिक्षण समारोह आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन तसेच दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते झाले.
गिरीराज सिंह व्यासपीठावर बसले असताना काही शेतकऱ्यांनी त्यांना अधिकारी आमचे ऐकत नसल्याची तक्रार केली. काहींनी लेखी तक्रारीही गिरीराज सिंह यांच्याकडे दिल्या. त्यामुळे त्यांनी भाषणातून अधिकाऱ्यांचाच समाचार घेतला.
‘माझ्याकडे सातत्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी येतात. ते सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखलच घेत नाहीत. खासदार, आमदार, सरपंच, जिल्हाधिकारी, बीडीओ साऱ्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी जनतेची सेवा करावी. पण हे सर्व ऐकत नसतील तर बांबू उचला आणि त्यांच्या डोक्यावर हाणा.’ अर्थात त्यानेही काम होत नसेल तर मी तुमच्या सोबत आहे, असेही ते म्हणाले.