” अदृष्य वाटाडया…”
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दारिद्रयाच्या खाईत अडकलेल्या एका विद्यार्थ्याला बाहेर काढत यशस्वी करणाऱ्या शिक्षकाच्या आदर्शवत अनुभव सांगणारा हा लेख
– रामदास शिंदे, नांदीन ता. बागलाण
माझ्या अंधकारमय जीवनात यशस्वी आयुष्याची वाट दाखवत स्वतः अदृष्य झालेले माझे गुरू कैै. अशोक देवरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त…..
प्रवासात रस्ते तर सगळीच कडे दिसतात. मात्र आपल्याला इच्छित स्थळी पोहचण्यासाठी नेमकी वाट दाखवणारा वाटाड्या जर योग्य वेळी भेटला तर आपला प्रवास सुखर होतो. असेच काहीसे आपल्या आयुष्याचेही आहे. जीवनाचा हा प्रवास करत असतांना योग्य वेळी योग्य रस्ता दाखवणारा वाटाड्याचा सहवास मिळाला तर आयूष्य कसे सुखकर होते हे मी अनुभवलं मात्र माझ्या सुंदर आयुष्याची वाट दाखवणारा वाटाड्या मात्र स्वतः अदृष्य झाला.
साधारण 1985 च्या दरम्यान माझ्या मुळ गावात शिक्षणाची सुविधा नसल्याने आजोबाच्या आग्रहास्तव मी किकवारी या मामाच्या गावी आले. तेथए राहून कपालेश्वरच्या आश्रम शाळेत 5 वी पासून शिक्षणासाठी दाखल झालो. आजोळचे कुंटूब मोठे असल्याने शिवाय आर्थिक परिस्थितीही नाजूक असल्याने मला शैक्षणिक साहित्य व अभ्यासात मोठया प्रमाणावर अडथळे येऊ लागले. आजोबांच्या घरासमोरच्या माडीवर अशोक देवरे हे माझे विज्ञानाचे शिक्षक खोली घेऊन राहत होते. अविवाहित असल्याने त्यांच्या खोलीत भरपूर जागा होती. माझी अडचण लक्षात आल्यावर त्यांनी मला त्यांच्या खोलीत अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्या दिवसापासून देवरे सरांनी माझे पालकत्व स्विकारले ते थेट डी.एड. पर्यंत.
8 वी पासून मला त्यांनी वस्तीगृहात निवासी व्यवस्था करून दिली. वह्या पुस्तकांपासून तर किरकोळ खर्चापासून सर्वच गरजा देवरे सरांकडून भागवल्या जाऊ लागल्याने साहजिकच माझे अभ्यासाकडे लक्ष लागू लागले. इ.10 वी ला 77.85 टक्के गुण मिळवून मी कपालेश्वर केंद्रात पाहिला आल्याचा सर्वाधिक आनंद अशोक देवरे सरांना झाला.
माझ्या घरची आर्थिक परिस्थिती व पालकांचे अज्ञान ओळखून त्यांनी मला कमी खर्च व लवकर नोकरी देणाऱ्या डी.एड. या पदवीचा सल्ला दिला. त्यांनीच माझे गुणपत्रक व दाखला स्वतःच काढून नाशिक गाठले. नाशिकसह नांदगाव शासकिय अध्यापक विद्यालयात (डी.एड.) साठी अर्ज दाखल केला. माझ्या गावात पत्रव्यवहाराची कोणतीही सुविधा नसल्याने देवरे सरांनी अर्जावर त्यांचाच पत्ता दिला.
दोन महिन्यांनी माझी पहिल्या च यादीत नांदगांवच्या शासकीय डी.एड. साठी निवड झाली. सरांच्या घरी प्रवेश पत्र प्राप्त झाले. पुढील शिक्षण होईल की नाही या अंधकाराने मी मात्र भाऊ सोबत विहीरी खोदायच्या कामाला जाऊ लागलो होतो. एक दिवशी देवरे सर दुचाकी घेऊन बांधा बांधावरून रस्ता तुडवत घरापर्यंत आले. कोरडवाहू शेतात मातीच्या भिंती आणी उसाच्या पाचटचे छप्पर अशी माझी परिस्थिती पाहून ते अक्षरशः गहिवरले. घरात एक आणाही नसतांना मुलाचे पुढचे शिक्षण कसे करावे ही आई-वडिलांच्या डोळ्यातील चिंता त्यांनी ओळखली.
मला दुचाकीवर बसवून त्यांनी घरी आणले. दुसऱ्या दिवशी स्वतः सर्व कागदपत्र घेऊन आम्ही नांदगांवला गेलो. तेथे प्रवेश प्रक्रीयेपासून तर होस्टेलसह सर्व व्यवस्था होईपर्यंत त्यांनी पुढाकार घेतला. दोन वर्षाच्या डी.एड. अभ्यासक्रमात त्यांची वेळोवेळी शैक्षणिक व आर्थिक मदत झाल्याने मी चांगल्या गुणांनी डी.एड. उत्तीर्ण झालो. दुसऱ्याच वर्षी मला प्राथमिक शिक्षकाची नोकरीही मिळाली. अवघ्या 18 व्या वर्षी शासकीय नोकरीचे भाग्य मला अशोक देवरे सरांमुळे लाभले.
असा हा माझ्या आयुष्याचे सोनं करून देणारा, यशस्वी जीवनाची वाट दाखवणारा वाटाड्या स्वतः मात्र 2 आक्टोबर 2017 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. आज देवरे सरांच्या स्मृती जागवतांना तो भूतकाळ डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
(मोबा -7588013709 )