नाशिक – भूपाली क्रिएटिव्हज या सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतर्फे दरवर्षी दिनरंग संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये नाशिक परिसरातील होतकरु, उदयोन्मुख युवा कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी पं.
गजाननबुवा जोशी पुरस्कार अथर्व ओंकार वैरागकर या युवा शास्त्रीय गायकाला तर पं. नारायणबुवा जोशी पुरस्कार युवा तबलावादक अथर्व नितीन वारे यांना काल ( दि.२३ ) जाहीर करण्यात आले. स्व. पं. दिनकर कैकिणी यांच्या स्मरणार्थ दिनरंग स्मृती महोत्सव लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी हे दोन्ही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. दोघांनाही घरुन सांगीतिक वारसा लाभला असून ते नेटाने तो पुढे नेत आहेत. भूपाली क्रिएटिव्हजचे प्रमुख संदीप आपटे यांनी अशी माहिती दिली. या संगीत महोत्सवात नाशिककर रसिकांना दमदार कलाकारांच्या कलेचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे असेही त्यांनी सांगितले.