मुंबई – देशभरात कोरोना महामारीची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत असून महाराष्ट्रात याचा अधिक प्रभाव जाणवत आहे. विशेषत: मुंबईत कोरोना बाधितांमध्ये चक्क ३२ टक्के तरुण असल्याची माहिती पुढे आली आहे. ही बाब चिंताजनक आहे. तरुणांना मोठ्या प्रमाणात लागण होत असून त्यामागे मास्कचा वापर न करणे हे असल्याचे सांगितले जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना आकडेवारीवरून असे आढळून आले आहे की, मुंबईत २० ते ३९ वर्ष वयोगटातील कोरोनाची लागण होणाऱ्याची संख्या ३२ टक्के आहे. सध्या मुंबईतील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ४,२३,३६० वर पोहोचली आहे, तर २० ते २९ वर्षे वयोगटातील ५९,२६२ लोक आणि ३० ते ३९ वर्षे वयोगटातील ७५ हजार ८७२ कोरोना रुग्ण आहेत. म्हणजेच एकूण रूग्णांपैकी ३२ टक्के रुग्ण हे तरूण आहेत यात महिलांपेक्षा पुरुषांची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
मात्र समाधानाची बाब अशी की, वयोगटातील संक्रमित लोकांचे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. आतापर्यंत या वयोगटातील ४८६ जण मरण पावले आहेत. या संदर्भात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मोठ्या संख्येने तरुणांना लागण होणे ही चिंताजनक बाब आहे. शहरातील लोकांचे दुर्लक्ष याला जबाबदार आहे. मुंबईत १ ते ५९ वर्षे वयोगटातील रुग्ण संख्या ३ लाख ८ हजार ८०४ आहे. म्हणजे संक्रमित एकूण ७३ टक्के आहे.
आतापर्यंत मुंबई शहरात कोरोनाने ११,७०४ मृत्यू झाले असून त्यापैकी ४,११८ या वयातील तरूणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंपैकी सुमारे ३५ टक्के आहे. त्याच वेळी कोरोना संसर्ग मुलांना मोठया प्रमाणात आहे. आतापर्यंत ९ वर्षांपर्यंतच्या ६,७९८ मुलांना संसर्ग झाला आहे, ज्यामध्ये १७ मुले मरण पावले आहेत.
तसेच १० ते १९ वर्षे वयोगटातील १६,६७७ मुलांना संसर्ग झाला आहे आणि त्यात ३२ मुलांचा बळी गेला आहे. ४० ते ४९ वर्षे वयोगटातील ७३,१३२ लोकांना संसर्ग झाला आहे, ज्यात १,०६५ लोक मरण पावले आहेत. तसेच ५० ते ५९ वर्षे वयोगटातील ७७,०६३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे आणि २,५१८ लोक मरण पावले आहेत.