सोलापूर – हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटात एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बोरी नदी व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सांगवी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ शेरीकर यांना रु.95 हजार 100 रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
—
नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन प्रस्ताव पाठवा
सोलापूर – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले.
सोलापुरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जीवितहानीची माहिती शक्य तितक्या लवकर संकलित करुन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा. हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषि, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
हवामान विभागाने येत्या आठवड्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि कृषि विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना द्याव्यात. पूर येण्याची शक्यता असणाऱ्या भागातील नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची काळजी घ्यावी. पावसात मनुष्यहानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.
महसूल मंत्री थोरात म्हणाले, पावसामुळे पुणे विभागातील जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेऊन राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल. त्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची नोंद देखील नुकसानीच्या अहवालामध्ये घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोलापूर तसेच पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पुणे विभागात सर्वाधिक जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरण केले. जिल्ह्यात शेती, फळबागा, रस्ते, वीज वहन यंत्रणा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. येत्या तीन चार दिवसात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.