वैतरणा धरणाची अतिरिक्त ठरत असलेली जमीन मुळ मालकांना देण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती
नाशिक : वैतरणा धरणाची उंची कमी केल्यामुळे संपादित केलेल्या क्षेत्रापैकी ६२३.२२ हेक्टर अतिरिक्त ठरत असून त्या जागेची पुन्हा आवश्यकता नसल्याने त्या जमीनी मुळ मालकांना परत देण्यासाठी शासन शाश्वत प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेवून मार्ग काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन, राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी केले.
वैतरणा विद्युत प्रकल्प ता. इगतपुरी येथे वैतरणा धरणग्रस्तांना ६२३.२२ हेक्टर अतिरिक्त जमीन शेतकऱ्यांना परत करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकित मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, गोदावरी मराठवाडा महामंडळाचे कार्यकारी संचालक एन.व्ही. शिंदे, अधिक्षक अभियंता व्ही. एस. घोगरे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता वाय.बी. पाटील, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार परमेश्वर कासूळे उपस्थित होते
मंत्री श्री. पाटील म्हणाले, वैतरणा जलविद्युत प्रकल्पांकरिता सन १९६२ ते १९६७ काळात एकूण ४ हजार ६८९ हेक्टर एवढे क्षेत्र संपादित करण्यात आले होते. परंतु शासनाने धरणाची उंची केल्यामुळे संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रापैकी ६२३.२२ हेक्टर इतक्या जमीनीचा भाग उरलेला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अतिरिक्त ठरलेल्या जमिनीचा लिलाव करण्याच्या सूचना असल्याने ती मुळ मालकला परत करणे शासनाला शक्य होत नसून यावर तोडगा काढण्यासाठी महसुल व वित्त विभाग आणि संबंधित विभागाची बैठक विधी विभागाच्या अधिकारऱ्यांसोबत घेवून मार्ग काढण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री.पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले,
बैठकी नंतर मंत्री श्री. पाटील यांनी वैतरणा धरणाची पाहणी करत असतांना वैतरणा व मुकणे या दोन्ही धरणाचे जलाशय विभागणारा वैतरणा कटक बंधारा हा वैतरणा धरणाच्या उजव्या तीरावर बांधण्यात आलेला आहे. या कटक बंधाऱ्याशेजारी सांडवा बांधून वैतरणा धरणाचे पाणी मुकणे धरणाकडे वळविण्याच्या प्रस्तावाबाबत जलसंपदा श्री. पाटील यांनी चर्चा केली.
शेतकऱ्यांनी दिले धन्यवाद
धरणग्रस्त शेतकऱ्यांचा विचार करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना मदत आणि न्याय देण्यासाठी स्वत: जलसंपदा मंत्री श्री. पाटील बांधावर आले आणि शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या आश्वासन दिल्यामुळे वैतरणा येथील उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी शासनाला यावेळी धन्यवाद दिले. आमदार श्री. खोसकर यांनी यावेळी, धरणग्रस्त मुलांच्या विकासासाठी त्यांना नगरपालिका क्षेत्रात नोकरी किंवा धरणाकडील भागांचा पर्यटनांच्या माध्यमातून विकास करुन छोटे मोठे उद्योग उभारुन तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा केली.
Good. Informative