मुंबई – लॉकडाऊन परिस्थितीत अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
ही भुकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेंतर्गत ६ लाख ५१ हजार मुलांना प्रतिदिन प्रतिविद्यार्थी १८ ग्रॅम याप्रमाणे ६ लाख ५१ हजार मुलांना आणि प्रतिदिन प्रतिमहिला २५ ग्रॅम याप्रमाणे १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना १ वर्षाकरीता दुग्धव्यवसाय विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला.
संपूर्ण जगभरात कोविड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात दि.२३ मार्च, २०२० पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या दूधाच्या मागणीत प्रचंड घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दूधाची परिस्थिती निर्माण होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी कमी दर प्राप्त होऊ लागला.
या अतिरिक्त दूधाच्या परिस्थितीत सूधारणा होऊन दुग्धव्यवसायात समतोल राखता यावा यासाठी शासनाने हस्तक्षेप करुन प्रतिदिन १० लक्ष लिटर मर्यादेपर्यंत दूध स्विकृत करुन सदर दूधाचे रुपांतरण करण्याची योजना घोषित केली होती. सदर योजना दिनांक ६ एप्रिल, २०२० ते ३१ जुलै, २०२० पर्यंत राबविण्यात आली. या योजनेद्वारे शासनामार्फत एकूण ५,९८,९७,०२० लिटर इतक्या दूधाची स्विकृती करण्यात आली असून या दूधाच्या रुपांतरणाव्दारे ४४२१ मे.टन दूध भुकटी २३२० मे.टन इतके देशी कुकींग बटर उत्पादन करण्यात आले.
तथापि, राज्यातील दुग्धव्यवसायात अद्यापही स्थिरता आलेली नसल्याने आज सदर योजना पुनश्च: दि.१ सप्टेंबर, २०२० ते दि.३१ ऑक्टोबर, २०२० या २ महिन्याच्या कालावधीकरीता राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनामार्फत रु.१९८.३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.