नाशिक – सिन्नर तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अजिंक्य वैद्य यांचे हृदयविकाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते ३२ वर्षांचे होते. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याचा हा परिणाम असल्याची चर्चा या निमित्ताने शासकीय वैद्यकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.
डॉ. अजिंक्य वैद्य हे सिन्नर तालुक्यातील वावी प्राथमिक आरोगय केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त होते. तर सिन्नर शहरातील शिवाजीनगरमध्ये ते राहत होते. शुक्रवारी सकाळी त्यांना छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी नाशिक येथे मॅग्नम हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवघे ३२ वर्षे वय असलेले डॉ. वैद्य यांच्या मृत्यूचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. यामुळे वैद्यकीय क्षेत्राला एकच धक्का बसला आहे. डॉ. वैद्य यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
अतिरिक्त ताणाचा परिणाम
डॉ. वैद्य हे गेल्या चार महिन्यांपासून सुट्टी न घेता वावी परिसरात कोरोनाविरोधात आरोग्यसेवा देत होते. सिन्नर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता, डॉ. वैद्य हे वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सातत्याने आसपासच्या खेड्यापाड्यावर जाऊन कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करीत होते. याशिवाय आरोग्यसेवाही अखंडितरीत्या देत होते. या काळात त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही, अपुरे मनुष्यबळ आणि नित्याची आरोग्यसेवा यामुळे सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्याचेच डॉ. वैद्य हे बळी ठरल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे.