नवी दिल्ली – तीन वेळा तलाक म्हटले की घटस्फोट झाला असे समजण्याच्या पद्धतीच्या विरोधात जाऊन, हे प्रकरण थेट सर्वाेच्च न्यायालयापर्यंत घेऊन जाणाऱ्या अतिया साबरी हिने आणखी एक महत्त्वाचा खटला जिंकला आहे. अतियाने नवऱ्याकडून उदरनिर्वाहासाठी रकमेची मागणी केली होती. त्यावर निर्णय देतानाा कुटुंब न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेंद्र कुमार यांनी अतिया साबरी हिच्या विनंती पत्राच्या तारखेपासून १३ लाख ४४ हजार रुपये तिला एकरकमी देण्याचा आदेश दिला आहे. तसेच त्यानंतर दर महिन्याला पोटगी म्हणून २१ हजार रुपये दिले जाणार आहेत. यात अतिया आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
अतियाने पती वाजिद अलीच्या विरोधात २४ नोव्हेंबर २०१५ रोजी न्यायालयात खटला दाखल केला. २५ मार्च २०१२ रोजी आपला वाजिद यांच्याशी विवाह झाला असून त्यावेळी आपल्या घरच्यांनी गाडी, दागिने, घरातील महत्त्वाचे सामान यासह अन्य गोष्टी मिळून २५ लाख खर्च केल्याचे याचिकेत म्हटले आहे. तरीही सासरचे २० लाखांची मागणी करत होते. मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी अतिराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला. त्यातून ती वाचली आणि माहेरी निघून आली. त्यानंतर २०१५ मध्ये तिच्या नवऱ्याने तिला तलाक दिला. त्या विरोधातही अतियाने न्यायालयात दाद मागितली.
ऊर्दू आणि समाजशास्त्रात एमए केलेली अतिया सध्या पतीकडून पोटगी मिळावी यासाठी लढते आहे. आपल्या नवऱ्याचे प्रतिमाह उत्पन्न १ लाख असून हीराे होंडा मोटारसायकलची डीलरशीप आणि १०० बिघा जमीन आहे. अतियाने स्वत:साठी २५ हजार तर आपल्या अल्पवयीन मुली सादिया आणि सना यांच्यासाठी दरमहा १० हजारांची मागणी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायाधीशांनी २२ मार्च रोजी हा निर्णय दिला. यामुळे अतियाला ५ वर्ष ४ महिन्यांचा पोटगी मिळणार आहे.
अतिया सांगते, ही लढाई माझ्यासाठी सोपी नव्हती. अनेकदा मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. पण न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. आणि तो खरा ठरला आहे. आपल्या हक्कांसाठी नेहमीच निर्भिडपणे लढण्याचा सल्लाही अतियाने महिलांना दिला आहे.