राळेगणसिद्धी – ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे ३० जानेवरी रोजी प्रस्तावित असलेले उपोषण मागे घेतले आहे. यासंदर्भात भाजपनेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे.
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक हमीभाव द्यावा तसेच स्वामिनाथन आयोगाला स्वायतत्ता द्यावी, अशी मागणी अण्णांनी केली होती. मात्र, ती मान्य न झाल्याने अण्णांनी ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अण्णांनी हा निर्णय जाहिर केल्यापासून भाजपकडून सातत्याने अण्णांची मनधरणी केली जात होती. त्यात यश येत नव्हते. अखेर आज फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी अण्णांची येथे भेट घेतली.
उपोषण मागे घेताना अण्णा म्हणाले की, केंद्र सरकारला आम्ही १५ मुद्दे दिले आहेत. त्यावर उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य तो निर्णय होईल, अशी खात्री वाटत असल्याने उपोषण मागे घेत असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केले.