नाशिक – कोरोना संकटकाळामुळे निधीची अडचण आहे. पण, जेथे काम पडेल तिथे निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कोविडची परिस्थिती आता हळूहळू सुधारत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठीही निधी एसटी महामंडळाला दिला. राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे भाजपच्या काळातील समृद्धी महामार्ग, मेट्रो असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करायचे काम सरकार करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अडचणींमधून वाट काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिकला विवाहसोहळ्यानिमित्त ते आले असता. त्यांनी हा संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या एकूण भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थितीत केले. ते म्हणाले की, खरिपाचे नुकसान झाले ऑक्टोबरमध्ये आणि टीम आली डिसेंबरमध्ये हे चुकीचे आहे. राज्य सरकारनं तातडीनं पत्रव्यवहार करूनही दोन दोन-तीन तीन महिने टीम येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले की, आधी कोरोनामुक्त महाराष्ट्र आणि देश व्हावा आणि त्यानंतर साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम व्हावे. साहित्य दुर्लक्षित करून चालणार नाही, पण कोरोना संकट महत्त्वाचे आहे.
ईडीच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, भाजप विरोधात बोलल्यास ईडीची पीडा मागे लागते असेही त्यांनी सांगितले.
लसबाबत त्यांनी सांगितले की,सरकार कुणाचंही असलं तरी लस कुणा एका पक्षाची नाही. कोरोना संकटकाळात कुणाही पक्षाने राजकारण आणू नये. पंढरपूरच्या भालके यांच्या रिक्त जागेवर पार्थ यांच्या नावाचा कसलाही विचार नाही. पार्थ यांच्या उमेदवारीच्या चर्चा खोट्या आहेत. पार्थ पवारचे नाव पुढेही चर्चेत नसेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नाशिक जिल्हा स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रश्नालाही उत्तर दिले. नव्या अर्थसंकल्पात त्यादृष्टीने तरतूद केली जाईल असेही पवार म्हणाले. यावेळी पवार यांनी जिल्ह्यातील कोव्हीड प्रादुर्भावाचा आढावा घेतला. तर पर्यटन महामंडळाच्या अधिका-यांना यावेळी त्यांनी सुचना केल्या.