नाशिक – जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना दोन वर्षापूर्वी रेल्वे प्रवासात पोलीसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला अट्टल दरोडेखोर येवला पोलीसांच्या हाती लागला आहे. आपले अस्तित्व बदलून तो वैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यात एका गावात वास्तव्यास होता. चोरट्यांचा माग काढत असतांना तो पोलीसांच्या हाती लागला असून, त्याने पोलीस पथकावर हल्ला करीत एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना चावा घेत धुम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश उर्फ सत्या जैनु काळे असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून त्याच्याविरूध्द राज्यभरात खून घरफोडी, जबरीचोरी आणि दरोड्या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. येवला तालूक्यातील खरवंडी आणि रहाडी या गावांमध्ये गेल्या सोमवारी (दि.१९) एकाच रात्री बºयाच ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या झाल्या होत्या. यापार्श्वभूमिवर पोलीस अधिक्षक सचिन पाटील आणि मनमाडचे उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे आणि उज्वलसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आले होते.
पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांना बिलवणी ता.वैजापूर (जि.औरंगाबाद) या गावात एक व्यक्ती संशयास्पद वास्तव्यास असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार भारम परिसरात सलग दोन दिवस पोलीसांनी सापळा लावला मात्र संशयीत हाती लागत नव्हता. गुरूवारी (दि.२२) संशयीत भारम गावात येताच पोलीसांनी त्याच्यावर झडप घातली असता त्याने पोलीसावर हल्ला केला. या घटनेत त्याने सहाय्यक निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्यासह हवालदार सानप आणि शिपाई सतीश मोरे यांना चावा घेतला. तरी पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या घरझडतीत कटावणी,टॉमी पक्कड,स्क्रु ड्रायव्हर,तीन टॉर्च आणि चॉपर व धारदार चाकू मिळून आला आहे.
संशयीत बिलवणी गावात शिवा जनार्दन काळे नाव धारण करून वावरत होता. पोलीस तपासात सन.२०१२ मधील बहुचर्चित रायगड जिह्यातील दरोड्यातील मुख्य आरोपी असल्याचे पुढे आले असून,त्याच्यासह बारा जणांच्या टोळीने दोन सुरक्षा रक्षकांची हत्या करीत दिवेआगर गणेश मंदिरातील सोन्याचा मुखवटा चोरला होता. अलिबाग (रायगड) येथील विशेष मोक्का न्यायालय तथा अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. सन.२०१८ मध्ये त्यास निफाड न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता तो पसार झाला होता. सुनावणी नंतर कैदी पार्टी त्यास रेल्वेने नागपूरच्या दिशेने प्रवास करीत असतांना त्याने भुसावळ रेल्वेस्थानकात पोलीसांची नजर चुकवून पोबारा केला होता. त्यानंतर तो विविध ठिकाणी नाव बदलून वास्तव्य करीत होता. संशयीताच्या अटकेने राज्यभरातील गंभीर गुह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.