नवी दिल्ली : देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोक नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी प्रथम पसंती देताना दिसून आल्याने अद्यापही देशात मोदींचा करिश्मा कायम असल्याचे आढळते. देशातील ५९.२२ टक्के लोक पंतप्रधानपदासाठी प्रथम पसंती देतात. तर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केवळ २५.६२ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पात्र मानले जातात. आयएएनएस सी-व्होटर्सच्या ‘स्टेट ऑफ नेश्न्स २०२१ च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशातील ८० टक्क्यांहून अधिक लोकांची पंतप्रधान म्हणून मोदी यांना पसंती आहे, तर ओरिसामध्ये ७.३६ टक्के आणि हिमाचल प्रदेशात १०.२० टक्के लोकांना राहूल यांना पंतप्रधानपदी पाहायचे आहेत.
मोदींसमोर राहुल कमकुवत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली असता राहुल गांधी कुठेही टिकत नाहीत. केरळ आणि तामिळनाडू वगळता असे कोणतेही राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश नाही, जिथे लोकांना राहुल गांधी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा आहे. १५ राज्यात राहुल गांधींची स्वीकृती २५ टक्क्यांहून कमी आहे. तर चार राज्यांमध्ये ते २० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
या क्षेत्रात केले सर्वेक्षण : देशभरातून सुमारे ३० हजार प्रतिसाद प्राप्त झाले आणि सर्व ५४३ लोकसभा मतदार संघांचा यात समावेश होता. यात देशातील बहुतांश राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता.
केंद्राच्या कार्याने देश खूष : कोविड -१९ साथीच्या काळात केंद्र सरकारच्या कामगिरीमुळे देशातील सरासरी ४१.६६ टक्के लोक फारच खूष आहेत. जास्तीत जास्त ७५.०२ टक्के लोक ओरिसामध्ये पूर्णपणे समाधानी आहेत, तर १६.४ टक्के काही बाबतीत समाधानी आहेत आणि केवळ ८.३ टक्के लोक असमाधानी आहेत. अशा प्रकारे एकूण समाधानाची पातळी ८३.१२ टक्के आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ६० टक्क्यांहून अधिक लोक समाधानी आहेत.
हे आहेत चांगले मुख्यमंत्री : एनडीए आणि बिगर-कॉंग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री अधिक चांगले काम करत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यापैकी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या कार्यामुळे लोक आनंदी आहेत. त्यांना ७८ टक्के लोकांनी स्वीकारले आहे, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ७७ टक्क्यांसह दुसर्या क्रमांकावर आहेत. या यादीतील सर्वात वाईट कामगिरी म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे रेटिंग फक्त ९ टक्के. त्याचप्रमाणे नवीन पटनायक ( ओडिशा ), अरविंद केजरीवाल (दिल्ली ) ,वाय एस जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश ),
पी.नारायण विजयन (केरळ ), उद्धव ठाकरे (महाराष्ट्र ) असे ५ मुख्यमंत्री चांगले काम करणारे असून वरच्या स्थानावर आहेत.
मोदींसारखे दुसरे कोणी नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि लोकप्रियता सर्वाधिक आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, काही वेळा मुख्यमंत्री आणि खासदारांच्या पातळीवर भारतीय जनता पक्षाला सत्ता विरोधी लाटेचा सामना करावा लागला आहे. मात्र लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे आहेत. कोविड -१९संकटात मोदींच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे प्रतिमा आणखी उंच झाली आहे.