नवी दिल्ली – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अचानक अफगाणिस्तानातील काबूलला भेट दिली. त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे. यावेळी तेथील राजकीय परिस्थिती, परस्पर सामरिक हितसंबंध, तसेच दहशतवादाविरूद्धच्या लढाईत सहकार्य आणि शांतता प्रक्रिया प्रस्थापित याविषयी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
अफगाण राष्ट्रपती भवनने प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकात असे म्हटले आहे की, दहशतवादाविरोधी लढाईतील सहकार्य बळकट करणे आणि अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक एकमत होण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. डोवाल यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला आहे, कारण तालिबान बंदीसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थापन केलेल्या समितीचा अध्यक्ष म्हणून भारत प्रमुख देश आहे. त्यामुळे शांतता चर्चा पुढे नेण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी डोभाल यांना सांगितले आहे की, अफगाणिस्तान आणि भारत हे नाटो आणि अमेरिकेसमवेत एकत्र येऊन दहशतवादाविरूद्ध अधिक यश मिळवू शकतात. डोवाल यांनी अफगाणिस्तानात झालेल्या राष्ट्रीय सलोखा उच्च परिषदेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला यांचीही भेट घेतली.
https://twitter.com/KarzaiH/status/1349408604022042632