घंटागाडी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा
नाशिक : अचानक काम बंद आंदोलन करीत, स्वच्छता निरीक्षकांना शिवीगाळ व दमबाजी केल्याप्रकरणी सहा घंटागाडी कर्मचार्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महादेव दगुजी खुडे (नारायणबापूनगर, जेलरोड), शिवनाथ दगडू जाधव, विठ्ठल नामदेव शिंदे, जयेंद्र दगडू पाडमुख, सुभाष संभाजी गवारे, नितीन बाळू शिराळ या कर्मचार्यांचा समावेश आहे. या प्रकरणी स्वच्छता निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, शहरात कोरोनाची साथ असल्याने कचरा संकलन करणे अत्यावश्यक आहे. घंटागाडी कर्मचार्यांना ठेकेदाराकडून मास्क, सॅनिटायझर तसेच इतर सुविधा मिळत नसल्याच्या कारणातून पंचवटी विभागातील सुमारे २३० घंटागाडी कर्मचार्यांनी अचानक काम बंद आंदोलन केले. स्वच्छता निरीक्षकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ व दमबाजी केली. या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बिडगर करीत आहेत.