रुद्रपूर (उत्तराखंड) – बरेचदा आपण सकाळी कोणाला भेटलो किंवा कोणत्या ठिकाणी गेलो होतो, हे आपल्या सायंकाळी लक्षात राहात नाही, परंतु काही मुलांची स्मरणशक्ती अफाट असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील रामपुरा येथील १५ वर्षीय अभिषेक चंद्रा हा मुलगा चक्क एका मिनिटापेक्षा कमी वेळेत म्हणजे ५८ सेकंदात तब्बल १९६ देशांची नावे सांगतो. त्यामुळे त्याचे नाव आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रात सूचीबद्ध असलेल्या सर्व देशांची नावे अभिषेक हा लगेच सांगतो. रामपुराच्या झोपडपट्टीत राहणारा अभिषेक चंद्रा याचा पिता राजकुमार चंद्रा एका उद्यानात हातगाडीवर शेंगदाणे विकतो. कुटूंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तो सकाळच्या वेळी वृत्तपत्रांचे वितरण करून शिक्षण खर्च भागवतो. तो सध्या आदित्यनाथ झा इंटर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात आहे.
अभिषेक म्हणाला की, लॉकडाऊन दरम्यान, त्याला जगातील देशांची नावे आठवण्यास सुरवात झाली. यानंतर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने त्याच्या रेकॉर्डवर दावा सांगण्यासाठी फॉर्म भरला, आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ पाठविला. चार टप्प्यात निवड झाल्यानंतर त्याला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब आणि सोशल मीडिया अकाउंटवर संस्थेने अपलोडही केला आहे. त्याला प्रमाणपत्र व पदकही देण्यात आले आहे.
दिवसभर मोबाईलमध्ये ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडियामध्ये व्यस्त असलेल्या तरुणांना, अभिषेक संदेश देतो की, इंटरनेटचा योग्य वापर केल्यास प्रगतीचा मार्ग मिळतो. इंटरनेट वापरुन लोक काहीही शिकू शकतात. अभिषेकने हायस्कूलमध्ये दहावीत ८९.४ टक्के गुण मिळविले असून भविष्यात त्याला अभियंता व्हायचे आहे.