- फास्टॅग मधील तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतरच त्याचा वापर अनिवार्य करा – अंबादास खैरे
- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रकल्प संचालकांना निवेदन
नाशिक – फास्टॅग मधील तांत्रिक त्रुटी दूर केल्यावरच फास्टॅगचा वापर नाशिकमधील टोल नाक्यांवर अनिवार्य करावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने प्रकल्प संचालक पाटील यांना दिले.केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल भरताना वाहनांवर फास्टॅग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु फास्टॅग बाबत अनेक तांत्रिक अडचणी असून त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला विनाकारण झळ बसत आहे. घोटी टोल नाक्यावर वाहनधारकांनी टोल भरल्यास पडघा टोल नाक्यावर टोल आकारण्यात येत नव्हते. तसेच पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर परतीच्या प्रवासासह टोल एकदा भरल्यास टोलची रक्कम कमी आकारली जात होती व पुन्हा परतीला टोल आकारण्यात येत नव्हता. परंतु घोटी टोल नाक्यावर फास्टॅग द्वारे टोल आकारला गेल्यास पडघा टोल नाक्यावर फास्टॅगच्या तांत्रिक त्रुटींमुळे पुन्हा टोल आकारला जात आहे. तसेच पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर परतीच्या प्रवासावेळी वाहनधारकांना जास्तीची रक्कम मोजावी लागत आहे. याकरिता फास्टॅग मधील तांत्रिक त्रुटी दूर केल्यावरच फास्टॅगचा वापर नाशिकमधील टोल नाक्यावर अनिवार्य करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी जय कोतवाल, बाळा निगळ, निलेश भंदुरे, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, संदीप गांगुर्डे, दिपक पाटील, किरण पानकर, निलेश सानप, नवराज रामराजे, हर्षल चव्हाण, योगेश आडभाई, अक्षय पाटील, अभिमन्यू गुडघे, संदीप खैरे, कल्पेश कांडेकर, राकेश गांगुर्डे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.