नवी दिल्ली – अपेक्षेप्रमाणे संसदेचे हिवाळी अधिवेशन अखेर रद्द करण्यात आले आहे. आता हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबत घेतले जाणार आहे. जानेवारीच्या अखेरीस अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. दिल्लीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. सर्व पक्षांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या काळात प्रथमच हिवाळी अधिवेशन रद्द झाले आहे.
दरम्यान, दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असून त्याबाबत हिवाळी अधिवेशनात चर्चा करावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिले होते. तर, शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन वाद होणार असल्याने अधिवेशन रद्द केल्याची टीका काही जणांनी केली आहे.