मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सायंकाळी संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज मातोश्रीवर बैठक होणार होती. मात्र राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे प्रकरण गंभीरतेनं घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. शिवसेनेतला विदर्भातला एक गट संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राठोड यांच्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेवर दबाव वाढला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत संजय राठोड यांच्याबाबतही चर्चा होऊ शकते.
काय आहे प्रकरण
बीडमधल्या परळीतल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध पूजा चव्हाण (वय २२) हिनं पुण्यात ८ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. वानवडी इथल्या हेवन पार्कमध्ये ती चुलत भाऊ आणि मित्रासोबत राहात होती. सोशल मीडियामध्ये विशेषतः टिकटॉक अॅपवर ती प्रसिद्ध होती. परंतु सोमवारी तिनं इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं. याप्रकरणी महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांवर आरोप झाले. या प्रकरणाबाबत दहा ते बारा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.
भाजपचा आरोप
याप्रकरणी भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील एक मंत्र्यांवर आरोप करण्यात येत आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलिसांनी यामधील सत्य तत्काळ बाहेर आणलं पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा मंत्री कोण याबाबत चर्चा सुरू असताना भाजपनं मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होता.